किनवट : कायदे फक्त सर्वसामान्यांचे खिसे कापण्यासाठी असतात आणि वाळू तस्करांसाठी लाल जाजमाची व्यवस्था असते, याचा जिवंत पुरावा सध्या किनवट तालुक्यातील म
किनवट : कायदे फक्त सर्वसामान्यांचे खिसे कापण्यासाठी असतात आणि वाळू तस्करांसाठी लाल जाजमाची व्यवस्था असते, याचा जिवंत पुरावा सध्या किनवट तालुक्यातील मौजे पांधरा येथे पाहायला मिळत आहे. आदिवासी भागाच्या रक्षणासाठी असलेल्या ‘पेसा’ कायद्याला धाब्यावर बसवून पैनगंगा नदीच्या पात्रातून दिवस-रात्र ट्रॅक्टर भरभरून रेतीची खुली दरोडेखोरी सुरू आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण दरोडेखोरीत स्थानिक महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी केवळ ’मूकप्रेक्षक’ नाहीत, तर तस्करांचे ’भागीदार’ असल्याचा खळबळजनक आरोप मौजे पांधराचे सरपंच दत्ता परसराम कर्हाळे यांनी केला आहे.
नदीचे काठ पोखरून पर्यावरण धुळीस मिळवले जात आहे, पण तहसीलदारांपासून ते गल्लीबोळातील कर्मचार्यांपर्यंत कोणाच्याही अंगावर काटा येत नाही. गावाने सी.सी.टी.व्ही. फुटेज, वाहनांचे क्रमांक, तस्करांची नावे आणि पोलीस पाटलांचा अहवाल ताटात वाढून प्रशासनासमोर ठेवला. तरीही महसूल यंत्रणेला गाढ झोपेतून जाग आलेली नाही. तक्रारींचे अर्ज कागदी घोड्यांवर स्वार होऊन धूळ खात पडून आहेत, कारण ’अर्थपूर्ण’ संबंधांपुढे कायद्याची धार बोथट झाली आहे. पेसा कायद्यानुसार ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय मातीचा खडाही हलवता येत नाही. मग महसूल अधिकार्यांच्या नाकाखाली रोज ट्रॅक्टरचे ताफेच्या ताफे कसे पळतात? पोलीस पाटलाने दिलेला अहवाल अन् सीसीटीव्हीचे स्पष्ट फुटेज हातात असतानाही गुन्हे दाखल करायला महसूल अधिकार्यांचे हात का थरथरतात? मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना केवळ कागदी आदेश देऊन तहसीलदार मोकळे झाले; प्रत्यक्ष कारवाईत तस्करांना अभय का दिले जात आहे? नुसत्या नोटीसांचा खेळ पुरे झाला! आता थेट जिल्हाधिकार्यांनी विशेष पथक पाठवून या वाळू तस्करांचा आणि त्यांना पोसणार्या लाचखोर अधिकार्यांचा बुरखा फाडावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तस्करांवर दंडात्मक वसुली ठोका आणि त्यांना पाठीशी घालणार्या संबंधित अधिकार्यांना तात्काळ बडतर्फ करा! अन्यथा कागदी तक्रारींचा काळ संपला असून, आता थेट बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग धरला जाईल, असा थेट आणि जहाल इशारा सरपंच दत्ता कर्हाळे यांनी दिला आहे. सदरील निवेदनाच्या प्रती थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूल सचिव आणि विभागीय आयुक्तांच्या टेबलावर आदळल्या असून, आता तरी मंत्रालयातून सूत्रे हलणार की स्थानिक पातळीवरील ’हप्तेशाही’ जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS