Homeताज्या बातम्या

शिक्षणाचा ’बाजार’ अन् हरवलेली शालेय प्रभा: गोकुंदा-किनवटच्या शिक्षणविश्वातील उघडे-नागडे वास्तव

किनवट : एकेकाळी ज्ञानदानाचे पावन आणि पवित्र मंदिर मानली जाणारी शाळा आज खाजगी शिकवणी वर्गांच्या गजबजलेल्या, गोंधळलेल्या बाजारात आपले अस्तित्व टि

‘गजिनी’ फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन
‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात १ कोटी ‘लखपती दीदी’ संकल्प अभियान; शासन निर्णय जारी
बीड शहराचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न पुन्हा सभागृहात; २० दिवसांआड येणारे पाणी २ दिवसांवर आणण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी महावितरणला वर्ग करण्याची आ. संदीप क्षीरसागर यांची मागणी

किनवट : एकेकाळी ज्ञानदानाचे पावन आणि पवित्र मंदिर मानली जाणारी शाळा आज खाजगी शिकवणी वर्गांच्या गजबजलेल्या, गोंधळलेल्या बाजारात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. ज्या मातीने केवळ शालेय बाकांवर बसून आभाळाएवढी उत्तुंग ध्येये गाठणारी ’अस्सल रत्ने’ घडवली, त्याच भूमीत आज शिक्षणाचे मोल पैशांच्या अनैतिक तराजूत तोलले जात आहे. ’माझाच वर्ग श्रेष्ठ’ असा टिमकी वाजवणारा भंपक जाहिरातबाजीचा भपका, पेपरफुटीच्या काळ्या सावळ्या आणि पैशांच्या जोरावर विकत घेतले जाणारे आभासी यश या सार्‍या गदारोळात सामान्य अन् गोरगरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य मात्र क्रूरपणे भरडले जात आहे.

पूर्वी शिक्षणात एक प्रकारचा सात्विक भाव नि निष्ठा होती. गुरुजींचा एक शब्द अन् शाळेच्या चार भिंतींचे वर्तुळ यातच भविष्याची स्वप्ने आकार घ्यायची. कोणत्याही महागड्या कोचिंग क्लासची कुबडी न घेता, याच सरकारी अन् अनुदानित शाळांच्या बाकावरून देश घडवणारे सनदी अधिकारी, नामवंत डॉक्टर आणि जगज्जेते तंत्रज्ञ निर्माण झाले. परंतु, आज परिस्थितीने अत्यंत विद्रूप रूप धारण केले आहे. ’अमुक गुण, तमुक निकाल’ अशा वल्गना करणार्‍या जाहिरातींच्या फलकांनी शहराचे चेहरे विद्रूप केले आहेत. यशाची छापील, बनावट चित्रे दाखवून पालकांच्या मनात भविष्याची नाहक भीती पेरली जाते; आणि दुर्दैवाने त्याच भीतीचे रूपांतर नंतर लाखांच्या ’फी’मध्ये केले जाते. शासकीय नियमावलीनुसार 16 वर्षांखालील बालकांना खाजगी शिकवणी वर्गात प्रवेश देण्यास सक्त मनाई आहे. बालपणाचा मोकळा श्वास आणि खेळाचे मैदान हिरावून न घेता त्यांना मुक्त वातावरणात शिक्षण मिळावे, हा यामागील उदात्त हेतू! मात्र, गोकुंदा आणि किनवटच्या गल्लीबोळात हा कायदा केवळ ’कागदी वाघ’ ठरला आहे. शाळा-कॉलेजमध्ये केवळ नावाची नोंदणी करून प्रत्यक्ष शिक्षण मात्र कोचिंग क्लासच्या गुदमरणार्‍या खोल्यांमध्ये घेण्याच्या ’डमी’ संस्कृतीने येथे घट्ट मुळे धरली आहेत. अवाढव्य फी उकळूनही अनेक क्लासेसमध्ये न हवेशीर खोल्या आहेत, न पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय! अग्निशामक यंत्रणेबाबत तर न बोललेलेच बरे. गुणवंत शिक्षकांचा केवळ भास निर्माण करून अननुभवी हातांमध्ये विद्यार्थ्यांचे भवितव्य सोपवले जात आहे. या चकचकीत आणि जीवघेण्या शर्यतीत ज्यांच्याकडे उधळायला अफाट पैसा आहे, त्यांचे ठीक; पण ग्रामीण भागातील आणि गोरगरीब घरातील ती ’अस्सल रत्ने’ जी केवळ पैशांअभावी या शर्यतीतून बाहेर फेकी जात आहेत त्यांच्यावर होणार्‍या या अन्यायाला जबाबदार कोण? शिक्षण विभाग या अनिर्बंध आणि समांतर शिक्षण व्यवस्थेकडे सोयीस्कर डोळेझाक करत असल्याची भावना आता अत्यंत तीव्र झाली आहे. शिक्षण ही विक्रीची वस्तू नसून संस्कारांचा आणि अधिकारांचा निर्मळ प्रवाह आहे. गोकुंदा-किनवटमधील या अनियंत्रित, नफेखोर कोचिंग संस्कृतीवर शिक्षण विभागाने वेळेत चाबूक चालवला नाही, तर ज्ञानाची ही पंढरी केवळ व्यापार्‍यांची मंडी बनून राहील! – संतप्त नागरिक व पालक वर्ग, गोकुंदा-किनवट

COMMENTS