कोपरगाव : जुन्या मुंबई-नागपूर महामार्गावरील संवत्सर येथील गोदावरी नदीवरील पुलाला मध्यभागी भगदाड पडल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेल

कोपरगाव : जुन्या मुंबई-नागपूर महामार्गावरील संवत्सर येथील गोदावरी नदीवरील पुलाला मध्यभागी भगदाड पडल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेल्या या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर प्रारंभ झाला आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या पुलावर काही ठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. परिणामी कोपरगावहून वैजापूर व छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
दरम्यान, अहिल्यानगर ते सावळीविहीर महामार्गाचे काम सुरू असल्याने धुळे-मालेगाव-मनमाड-येवला मार्गे कोपरगाववरून जाणारी वाहतूक पुणतांबा फाट्यावरून याच महामार्गावर वळविण्यात आली होती. त्यामुळे संवत्सर पुलावरील वाहतूक बंद झाल्याने पर्यायी मार्गांवर ताण वाढून कोपरगाव-शिर्डी मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी १८ मार्च रोजी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. त्यानुसार आता कामाला सुरुवात झाली आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला होणार असून पूर्वीप्रमाणे वाहतूक सुरळीत होईल. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे आ. काळे यांनी सांगितले.
संवत्सर पुलाच्या दुरुस्तीबाबत आमदार आशुतोष काळे यांनी १८ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. अवघ्या महिन्याभरात दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाल्याने त्यांच्या तत्परतेची चर्चा होत आहे.

COMMENTS