Homeताज्या बातम्या

श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या जागेवरील अनधिकृत बांधकामे हटवा

शेवगाव : शेवगाव नगरपरिषद हद्दीतील श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या गट क्रमांक १३१३, १३१४ व १३१५ मधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचे निर्देश शेवगा

वसंतदादा पाटील विद्यालयात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
श्रीगोंदा येथे कुकडी कॅनॉलवरील अनधिकृत पाईपलाईन हटवा
आयआयटी मुंबई येथे विद्यार्थ्याची आत्महत्या; वसतिगृहातील खोलीत घेतला गळफास

शेवगाव : शेवगाव नगरपरिषद हद्दीतील श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या गट क्रमांक १३१३, १३१४ व १३१५ मधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचे निर्देश शेवगाव नगरपरिषदेने संबंधितांना दिले आहेत. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी याबाबत नोटीस बजावून, नोटीस प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत संबंधित अनधिकृत बांधकामे स्वखर्चाने काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा सहआयुक्त, नगरपरिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या २३ जुलै २०२६ रोजीच्या पत्राच्या तसेच शेवगाव येथील रहिवासी अविनाश दिगंबर देशमुख यांनी १३ जुलै २०२६ रोजी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आली आहे.

उपविभागीय अधिकारी, पाथर्डी भाग, पाथर्डी यांच्या ३ मार्च २०२० रोजीच्या पत्रात श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या ईनाम वर्ग-३ जमिनीवरील भाडेपट्टा कराराबाबतचा विषय नमूद करण्यात आला होता. या प्रकरणात महसूल विभागाकडून पुनरिक्षणाची कार्यवाही करण्यात आली. संबंधित हितसंबंधितांना लेखी अथवा तोंडी म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आल्यानंतर प्रकरणात गुणवत्तेवर निकाल पारित करण्यात आला. त्यानुसार संबंधित गटांवरील भाडेपट्ट्याच्या फेरफार नोंदी रद्द करण्यात आल्याचे नगरपरिषदेच्या पत्रात नमूद आहे.

या पार्श्वभूमीवर श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या गट क्रमांक १३१३, १३१४ व १३१५ वरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी संयुक्त स्वरूपाची मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अनधिकृत बांधकामे निष्कासित केल्यानंतर त्याबाबतचा अनुपालन अहवाल छायाचित्रणासह सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, संबंधितांनी नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत अनधिकृत बांधकामे स्वतःच्या खर्चाने हटविली नाहीत, तर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १८१ व १८९ अन्वये पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नगरपरिषदेने दिला आहे. या कारवाईसाठी होणारा संपूर्ण खर्च आणि त्यासंबंधित जबाबदारी संबंधितांचीच राहणार असल्याचेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची माहिती जिल्हा सहआयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच शेवगाव पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे. संबंधित संयुक्त अतिक्रमण निष्कासन मोहिमेसाठी महसूल व पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने पुढील कार्यवाही होण्याची शक्यता आहे.

अध्यक्षांशी संपर्क होईना.. ! याबाबत श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुहास गालफाडे त्यांच्याशी संपर्क साधून याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपला भ्रमणध्वनी उचलला नाही. त्यामुळे त्यांची अधिकृत प्रतिक्रिया समजू शकली नाही.

COMMENTS