खा. बजरंग सोनवणे यांच्या प्रश्नाला केंद्रीय पर्यटन मंत्र्यांचे उत्तर बीड: मागील १० वर्षांत देशांतर्गत पर्यटकांमध्ये १२९ टक्क्यांची विक्रमी वाढ
)
खा. बजरंग सोनवणे यांच्या प्रश्नाला केंद्रीय पर्यटन मंत्र्यांचे उत्तर
बीड: मागील १० वर्षांत देशांतर्गत पर्यटकांमध्ये १२९ टक्क्यांची विक्रमी वाढ झाली असून परदेशी पर्यटकांचा आकडाही २ कोटींच्या पार पोहोचल्याची माहिती केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी दिली आहे. बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) खासदार बजरंग सोनवणे यांनी लोकसभेत विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली.
पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि कोट्यवधींच्या निधीनंतरही भारताचे पर्यटन क्षेत्र जागतिक पातळीवर अपेक्षित क्षमता गाठू शकले आहे का, असा सवाल खा. बजरंग सोनवणे यांनी लोकसभेत उपस्थित करून सरकारला धारेवर धरले होते. यावर केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले की, २०१४ मध्ये भारताला भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या १.३१ कोटी होती, ती २०२४ पर्यंत ५६.९३ टक्क्यांनी वाढून २.०६ कोटींवर पोहोचली आहे. तर देशांतर्गत पर्यटनात तब्बल १२९.६० टक्क्यांची विक्रमी वाढ झाली असून पर्यटकांचा आकडा १२८.२८ कोटींवरून थेट २९४.५३ कोटींवर गेला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या ‘वर्ल्ड टूरिझम बॅरोमीटर २०२६’ नुसार, जागतिक पर्यटनातील भारताचा वाटा १.१५ टक्क्यांवरून १.४१ टक्के झाला आहे. तसेच, जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकात (Travel and Tourism Development Index) भारताने ११९ देशांमध्ये ३९ वे स्थान पटकावले असून सार्क (SAARC) देशांमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
उणिवा दूर करण्यासाठी सरकारी मोहीम
पर्यटन क्षेत्रातील त्रुटी आणि कनेक्टिव्हिटीच्या उणिवा ओळखण्यासाठी सरकारने ‘स्टेट टूरिझम परफॉर्मन्स फ्रेमवर्क’ विकसित केले असल्याचे शेखावत यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जागतिक पर्यटन प्रदर्शनांमधील सहभाग, परदेशी टूर ऑपरेटर्ससाठी परिचय दौरे, इंडिया फूड फेस्टिव्हल आणि सोशल मीडियाद्वारे विविध पर्यटनस्थळांचे जागतिक स्तरावर जोरदार प्रमोशन केले जात आहे. खा. बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे देशातील पर्यटन विकासाच्या धोरणांवर पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

COMMENTS