सोलापूर : जिल्ह्यातील कुर्डूवाडी परिसरात उघडकीस आलेल्या भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. व्यवसायात प्रचं
सोलापूर : जिल्ह्यातील कुर्डूवाडी परिसरात उघडकीस आलेल्या भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. व्यवसायात प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.
आरोपींच्या बाजूने वकिलांनी अटकेची प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा मुद्दा उपस्थित केला. गुन्ह्यांतील कलमे सात वर्षांखालील असल्याने नोटीस देऊन चौकशी करणे आवश्यक होते, असा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, सरकारी पक्षाने याला ठाम विरोध दर्शवला. मनोहर भोसले हा सराईत स्वरूपाचा आरोपी असून त्याच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे नोंद असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पुढील तपासासाठी पोलीस कोठडी अत्यावश्यक असल्याचेही सांगण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत अधिक पुरावे गोळा करून फसवणुकीचे जाळे उलगडण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे. या प्रकरणातील तक्रारींची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यानंतर पुण्यातील मांजरी परिसरातून मनोहर भोसलेला ताब्यात घेण्यात आले. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणूक तसेच जादूटोण्याशी संबंधित गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणात आणखी पीडित समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यापूर्वीही त्याच्याविरोधात अत्याचार आणि फसवणुकीचे गुन्हे विविध ठिकाणी नोंद झाले आहेत. तरीही त्याने आपली भोंदूगिरी सुरूच ठेवल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे.या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अशा प्रकारच्या भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आलिशान आश्रमामुळे चर्चेत
मनोहर भोसले याचा करमाळा तालुक्यातील घोटी परिसरात सुमारे 27 एकरांवर पसरलेला आलिशान आश्रम असल्याची माहिती पुढे आली आहे. अमावस्या आणि पौर्णिमेला येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असे. तथाकथित दर्शन आणि मार्गदर्शनासाठी मोठी रक्कम आकारली जात असल्याचेही तपासात समोर आले आहे.
कोण आहे मनोहर भोसले?
मूळचा इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावचा रहिवासी असलेला मनोहर भोसले सुरुवातीला साध्या व्यवसायातून उदरनिर्वाह करत होता. काही वर्षांनंतर त्याने स्वतःला धार्मिक शक्ती लाभल्याचा दावा करत मठ उभारला. आजार बरे करण्याचे, अडचणी दूर करण्याचे आश्वासन देत त्याने अनेकांना जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे.

COMMENTS