खा. बजरंग सोनवणे यांचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र बीड: राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा अर्थात 'री-नीट' (२०२६) च्या

खा. बजरंग सोनवणे यांचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र
बीड: राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा अर्थात ‘री-नीट’ (२०२६) च्या निकालात अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रकार समोर आल्याने देशभरातील हजारो वैद्यकीय विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या ‘ओएमआर शीट’नुसार मिळणारे गुण आणि प्रत्यक्ष अधिकृत ‘स्कोरकार्ड’वरील गुण यामध्ये प्रचंड तफावत आढळल्याने मोठा खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची तात्काळ स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करून नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून (NTA) स्पष्टीकरण मागवावे, अशी मागणी खा. बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
खा. बजरंग सोनवणे यांनी पत्रात बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची उदाहरणे देत एनटीएच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्ञानेश्वरी पवार (वडवणी, जि. बीड) या विद्यार्थिनीला तिच्या ओएमआर उत्तर-पत्रिकेच्या पडताळणीनुसार ७२० पैकी तब्बल ७०२ गुण मिळणे अपेक्षित होते. मात्र, एनटीएने जाहीर केलेल्या अधिकृत स्कोरकार्डवर तिला अवघे ८७ गुण दर्शवण्यात आले आहेत. सोहम गवते या विद्यार्थ्याला ओएमआरनुसार ५२२ गुण मिळणे आवश्यक असताना, गुणपत्रकावर केवळ ९५ गुण दाखवले गेले आहेत. एकाएकी शेकडो गुणांचा फरक पडल्याने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड नैराश्य व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही केवळ दोन विद्यार्थ्यांची समस्या नसून संपूर्ण देशभरात असा प्रकार घडला असण्याची मोठी शक्यता खा. सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. या पत्राच्या प्रती शिक्षण राज्यमंत्री, केंद्रीय शिक्षण सचिव, एनटीएचे महासंचालक आणि नॅशनल मेडिकल कमिशनच्या अध्यक्षांनाही आवश्यक कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
पत्रातील प्रमुख मागण्या:
- री-नीट २०२६ च्या निकालातील सर्व विसंगतींची तात्काळ स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
- तक्रारदार विद्यार्थ्यांच्या ओएमआर शीट, उत्तरतालिका आणि गुणपत्रकांची पारदर्शकपणे पुन्हा तपासणी व्हावी.
- या संपूर्ण प्रकारावर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून तात्काळ सविस्तर तथ्यात्मक अहवाल मागवण्यात यावा.
- जिथे त्रुटी किंवा गोंधळ सिद्ध होईल, तिथे निकालात तातडीने दुरुस्ती करून गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय दिला जावा.
- भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी पारदर्शक मूल्यांकन पद्धत आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी.
‘एनटीए’च्या विश्वासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
अशा प्रकारच्या चुकांमुळे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्षांनुवर्षे मेहनत करणार्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळला जात आहे. या प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी स्वतः वैयक्तिक हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना त्वरित न्याय द्यावा, अशी भूमिका खा. बजरंग सोनवणे यांनी घेतली आहे.
“देशात नीट परीक्षेत घोटाळे होतात. आज देशभरातील विद्यार्थी आपल्या हक्कासाठी शांततापूर्ण आंदोलन करत आहेत, मात्र त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी त्यांच्यावर लाठीमार होत असल्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. विद्यार्थी हे देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने आणि मानवतेच्या दृष्टीने पाहणे ही सरकारची जबाबदारी आहे.”
– खा. बजरंग सोनवणे, बीड.

COMMENTS