आदिलाबाद ते नांदेड दरम्यान धावणार्या इंटरसिटी एक्सप्रेसला गोकुंदा येथील रेल्वे गेटवर रोज सायंकाळी साखळी (चेन) ओढून बेकायदेशीरपणे थांबवण्याचा प्र

आदिलाबाद ते नांदेड दरम्यान धावणार्या इंटरसिटी एक्सप्रेसला गोकुंदा येथील रेल्वे गेटवर रोज सायंकाळी साखळी (चेन) ओढून बेकायदेशीरपणे थांबवण्याचा प्रकार आता अत्यंत गंभीर आणि जीवघेणा बनला आहे. काही विकृत मानसिकतेच्या टवाळखोरांनी आणि समाजकंटकांनी रेल्वे प्रशासनाला थेट आव्हान दिले असून, त्यांच्या या हुल्लडबाजीमुळे गोकुंदा रेल्वे गेटवर दररोज वाहतुकीचा प्रचंड खेळखंडोबा होत आहे. रेल्वे सुरक्षाबलाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि ढिलाईमुळे हे समाजकंटक मोकाट फिरत असून, या विघातक घटकांना तात्काळ जेरबंद करून तुरुंगात डांबावे, अशी संतप्त मागणी आता किनवट आणि गोकुंदावासीयांतून होत आहे.
या विकृत प्रकाराचा सर्वात मोठा आणि भयानक फटका अत्यावश्यक सेवांना बसत आहे. गोकुंदा रेल्वे गेट हे आधीच अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे. त्यातच टवाळखोर ट्रेन थांबवत असल्याने रेल्वे गेट अर्धा तास बंद राहते. परिणामी, गंभीर रुग्णांना घेऊन जाणार्या रुग्णवाहिका (म्बुलन्स) या वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत. केवळ स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा ’टाईमपास’ म्हणून ट्रेन थांबवणार्या या नराधमांमुळे उद्या एखाद्या निष्पाप रुग्णाचा जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण? असा जळजळीत सवाल नागरिक विचारत आहेत. सायंकाळची वेळ ही नोकरदार, व्यावसायिक आणि शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परतीची असते. नेमक्या याच मुख्य वेळी इंटरसिटी एक्सप्रेसची चेन ओढून गाडी उभी केली जात असल्याने गेटच्या दोन्ही बाजूंना शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. रेल्वेचे कडक नियम धाब्यावर बसवून चालणार्या या प्रकारामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचे जाहीर धिंडवडे निघत आहेत. हा प्रकार आता नित्याचाच झाला असून, यामागे रेल्वे पोलिसांचे असलेले संशयास्पद दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. रेल्वे सुरक्षा बल नेमकी कसली सुरक्षा करत आहे? असा प्रश्न उपस्थित होत असून रेल्वे प्रशासनाच्या संपूर्ण कार्यप्रणालीवरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या ठिकाणी तात्काळ रेल्वे पोलिसांची 24 तास गस्त वाढवावी आणि चेन ओढणार्यांना जागेवरच पकडून त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत. अन्यथा या रोजच्या त्रासाला कंटाळलेली जनता रेल्वे प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडेल!

COMMENTS