Homeताज्या बातम्या

जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची कसोटीअशोकराव चव्हाण-प्रतापराव पाटील चिखलीकर यांची मैत्री कायम राहणार?

विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांनी परस्पर समन्वय राखत निवडणूक लढविल्यानंतर आता नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच

प्रचंड गरीबी, अल्पदृष्टी आणि वडिलांचे छत्र हरपले तरीही हार नाही; करण गायकवाड एमपीएससी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण
अर्धापूर येथील सिग्मा प्रीमिअरलीग क्रिकेट स्पर्धेचे व्दितीय बकक्षीस राजयोग चालेंजर्सने पटकावले
जि.प. मध्ये खा. अशोकराव चव्हाण यांची मॅरेथॉन बैठक, प्रशासनाची झाडाझडती



विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांनी परस्पर समन्वय राखत निवडणूक लढविल्यानंतर आता नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः भाजपचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही एकत्र राहणार की स्वतंत्र रणनीती आखणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विधान परिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचा धर्म पाळत सहकार्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही हा समन्वय कायम राहील का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेतील सत्ता हस्तगत करण्यासाठी महायुतीने एकत्रितपणे रणनीती आखल्यास अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारांची जुळवाजुळव करावी लागणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळातील सुमारे आठ ते दहा जागांवर महायुतीसमोर जागावाटपाचे मोठे आव्हान उभे राहू शकते. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे अनेक इच्छुक आणि प्रभावी स्थानिक नेते असल्याने प्रत्येक मतदारसंघात समन्वय साधणे सोपे राहणार नाही. त्यामुळे आगामी काळातील वाटाघाटींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकीय चर्चेनुसार अर्धापूर, लोहा या तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय भोकर, बिलोली, मुखेड आणि नायगाव परिसरातही राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावेदारी केली जाऊ शकते. या सर्व ठिकाणी भाजपप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसकडेही निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले मातब्बर नेते असल्याने जागावाटपाची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासमोर त्यांच्या समर्थकांची राजकीय सोय करण्याचे आव्हान असेल, तर भाजपलाही आपल्या इच्छुकांना न्याय देत महायुतीतील समतोल राखावा लागणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील समन्वयाची खरी परीक्षा आता जिल्हा बँक निवडणुकीत होणार असल्याचे चित्र आहे. विधान परिषद निवडणुकीत दिसून आलेला महायुतीतील एकोपा हा केवळ त्या निवडणुकीपुरता मर्यादित होता की तो सहकार क्षेत्रातील या महत्त्वाच्या निवडणुकीतही कायम राहणार, याचे उत्तर आगामी राजकीय घडामोडींमधून स्पष्ट होणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत समीकरणे आणि नेतृत्वाची राजकीय ताकद पुन्हा एकदा कसोटीवर लागणार असल्याचे मानले जात आहे.

COMMENTS