Homeताज्या बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६: पात्र लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध होणार! आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

नांदेड: महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी लाभा

पांढरी येथे पायाभूत सुविधांसाठी 3 कोटींचा निधी
पाच लाखाची लाच मागणारा एपीआय एसीबीच्या जाळ्यात
लोहा- कंधार तालुक्यासाठी 11 कोटींचा निधी मंजूर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' ही केवळ  कर्जमाफीची योजना नाही; ती शेतकऱ्याच्या नव्या सुरुवातीचा पाया आहे ...

नांदेड: महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. पात्र शेतकऱ्यांनी याद्यांमधील आपले नाव, कर्जाचा तपशील आणि इतर माहितीची खातरजमा करून तातडीने बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, लाभार्थ्यांच्या याद्या गाव चावडी, ग्रामपंचायत, संबंधित बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्था येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांनी त्यामध्ये आपले नाव समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच कर्ज खाते क्रमांक, कर्जाची रक्कम व इतर सर्व तपशील अचूक असल्याची पडताळणी करावी.

यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना दिलेला विशिष्ट क्रमांक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरण करावे लागणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ग्रीस्टॅक (Gristack) नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लाभार्थी यादीतील तपशील, कर्ज खाते क्रमांक व कर्जाच्या रकमेबाबत सहमती नोंदवल्यानंतर बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण केले जाईल. त्यानंतर योजनेअंतर्गत मंजूर झालेली कर्जमुक्तीची रक्कम थेट संबंधित बँकेच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी लाभार्थी याद्या प्रसिद्ध होताच आवश्यक पडताळणी करून प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी आणि या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी केले आहे.

COMMENTS