बीडचे भूमिपुत्र अॅड. वसंतराव साळुंके यांचा नागरी सत्कार बीड: समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीलाही न्याय मिळाला पाहिजे, ही जाणीव ठेवून अॅड.

बीडचे भूमिपुत्र अॅड. वसंतराव साळुंके यांचा नागरी सत्कार
बीड: समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीलाही न्याय मिळाला पाहिजे, ही जाणीव ठेवून अॅड. वसंतराव साळुंके यांनी वकिली व्यवसायासोबत सामाजिक कार्याचीही जोड दिली. महाराष्ट्र-गोवा बार कॉन्सिलच्या कार्यकारिणीवर सलग पाचव्यांदा निवडून येत त्यांनी बीडसह मराठवाड्याचा सन्मान वाढविला, असे गौरवोद्गार उद्योजक मानसिंग पवार यांनी काढले.
महाराष्ट्र-गोवा बार कॉन्सिलच्या कार्यकारिणीवर अॅड. वसंतराव दिगंबरराव साळुंके यांची सलग पाचव्यांदा निवड झाल्याबद्दल पैठण रोड येथील ग्रॅण्ड कल्याण सभागृहात नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, उद्योजक मानसिंग पवार, बार कॉन्सिल सदस्य अॅड. राजेंद्र उमाप, अॅड. वसंतराव साळुंके व मधुमती साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते अॅड. वसंतराव साळुंके व त्यांच्या पत्नी मधुमती साळुंके यांचा स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मानपत्राचे लेखन व वाचन डॉ. संजय शिंदे यांनी केले.
1998 पासून सुरू असलेला त्यांचा विजयाचा प्रवास अखंडपणे सुरू असून हा बार कॉन्सिलच्या इतिहासातील उल्लेखनीय विक्रम मानला जात आहे. उद्योजक मानसिंग पवार यांनी अॅड. साळुंके यांचा वसा आणि वारसा नवीन पिढीने पुढे नेण्याचे आवाहन केले. तर एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी अॅड. साळुंके यांना तहहयात सदस्यत्व द्यावे, अशी भावना व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना अॅड. वसंतराव साळुंके भावुक झाले आणि वकिलांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले, ही कृतज्ञतेची भावना कायम राहील असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ रमेशराव धोर्डे आणि मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी अॅड. साळुंके यांच्या निगर्वी स्वभावाचे आणि वकिलांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने लढण्याच्या भूमिकेचे कौतुक केले. तर बळीराम साळुंके यांनी अॅड. साळुंके यांच्या पर्यावरण संवर्धनासाठीच्या वृक्षारोपण उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. रवींद्र गोरे यांनी केले, सूत्रसंचालन अॅड. दीपक देशमुख यांनी तर आभार अॅड. सुदर्शन साळुंके यांनी मानले. या सोहळ्याला आमदार विक्रम काळे, माजी आमदार मोहनराव साळुंके, अरविंद गोरे यांच्यासह राज्यभरातून आलेले शेकडो वकील व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS