नांदेड : जन्मदात्या आईची मुलाने निर्घृणपणे हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि मन हेलावून लावणारी घटना नांदेड शहरातील रा

नांदेड : जन्मदात्या आईची मुलाने निर्घृणपणे हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि मन हेलावून लावणारी घटना नांदेड शहरातील राहुलनगरमध्ये शनिवारी घडली. हत्येनंतर आरोपी मुलगा अर्धा तास आईच्या फोटोला स्क्रूड्राईव्हर मारत राहिला. भारती चौथरे (वय ५०) असे मयत आईचे नाव असून प्रतिक चौथरे (वय २६) असे आरोपी मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रतिक चौथरे हा तरोडा भागातील राहुलनगरमध्ये आपल्या आईसोबत राहत होता. त्याचे वडील बालाजी चौथरे हे सीआरपीएफमध्ये कार्यरत असून सध्या चेन्नई येथे तैनात आहेत, तर त्याची बहीण पुण्यामध्ये शिक्षण घेत आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रतिकचा त्याच्या आईसोबत वाद झाला. याच वादातून त्याने आईला मारहाण करत तिच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. यामध्ये अतिरक्तस्त्राव झाल्याने भारती चौथरे यांचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी मुलगा खोलीतील मयत आईच्या फोटोवर अर्धा तास स्क्रूड्राईव्हरने वार करत राहिला. घरातून आरडाओरड ऐकू आल्याने आसपासचे नागरिक जमा झाले. घराबाहेर गर्दी झाल्याचे पाहून तो घाबरला आणि दुसऱ्या खोलीत जाऊन त्याने गळफास घेतला. माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी भारती यांचा मृतदेह रक्तबंभाळ अवस्थेत, तर प्रतिकचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. प्रतिक मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होता आणि त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रतिक हा अतिशय हुशार विद्यार्थी होता आणि त्याच्या खोलीत अनेक मेडल आढळून आले. काही महिन्यांपूर्वीच तो रेल्वेची परीक्षा उत्तीर्ण झाला असून त्याला जॉइनिंग लेटरही आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आईचा जीव घेण्यामागचे नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली.

COMMENTS