मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर तीव्र शब्दांत टीका करत फोडाफोडीच्या
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर तीव्र शब्दांत टीका करत फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकशाही मूल्ये आणि सामाजिक संस्कृती धोक्यात आल्याची खंत व्यक्त केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला.
राज ठाकरे म्हणाले की, सत्तेसाठी सुरू असलेले राजकारण दिवसेंदिवस अधिक अस्वस्थ करणारे बनत असून त्याचा विपरीत परिणाम समाजावर होत आहे. सत्तेवर कायमस्वरूपी अधिकार कोणाचाही नसतो आणि जनतेच्या विश्वासावरच राजकीय पक्षांचे अस्तित्व टिकून असते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, विरोधकांना संपविण्याच्या प्रयत्नांमुळे तात्पुरते राजकीय लाभ मिळू शकतात; मात्र त्यातून नव्या संघर्षांना आणि अंतर्गत मतभेदांना जन्म मिळतो. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाचा मार्ग लोकशाहीसाठी हितकारक ठरत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. भविष्यात कोणत्याही पक्षाला सत्तेपासून दूर जावे लागू शकते आणि त्यावेळी आज राबविल्या जाणार्या राजकीय डावपेचांचे परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. काही राज्यांमध्ये अशा प्रकारच्या राजकारणामुळे सामाजिक आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याचे उदाहरण देत महाराष्ट्राने त्या अनुभवांतून धडा घ्यावा, असे त्यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे भारतीय जनता पक्षाला व्यापक जनाधार मिळाला असल्याचे सांगतानाच, देशात आणि राज्यात घडणार्या अनेक राजकीय हालचालींवर केंद्रीय नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजकीय विस्तारासाठी स्वीकारल्या जाणार्या पद्धतींचा लोकशाही व्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो, असेही ते म्हणाले. शिवसेनेतील विविध घडामोडींचा उल्लेख करताना त्यांनी पक्षांतराच्या घटनांमागील राजकीय समीकरणांवर भाष्य केले. काही लोकांनी विशिष्ट पक्षाचा मार्ग का स्वीकारला, यावर सार्वजनिक चर्चेची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक असले तरी त्यासाठी मर्यादा आणि नैतिक मूल्ये जपली गेली पाहिजेत, असे प्रतिपादन करत राज ठाकरे यांनी सध्याच्या वातावरणामुळे राज्यातील तरुण पिढीसमोर चुकीचे आदर्श निर्माण होण्याची भीती व्यक्त केली. लोकशाहीतील संवाद, परस्पर सन्मान आणि विचारांचा संघर्ष यांनाच प्राधान्य मिळाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

COMMENTS