Homeताज्या बातम्या

पीएमश्री शाळेलाच कुलूप; शिक्षकांविना शिक्षणाचा बोजवारा!

आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथील प्रकाराबाबत थेट पंतप्रधानांकडे तक्रार बीड : केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी 'पीएमश्री' (PM SHR

आदित्य नर्सिंग महाविद्यालयाचा 7 व्या सत्राचा निकाल 100 टक्केयशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सन्मान
बीड एलसीबीची धडाकेबाज कारवाईसोमनवाडी शिवारात धाबा चालकाकडून गावठी पिस्टल जप्त, एकास अटक
भवानी चौक ठरू लागला अपघाताला निमंत्रण

आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथील प्रकाराबाबत थेट पंतप्रधानांकडे तक्रार

बीड : केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘पीएमश्री’ (PM SHRI) योजनेअंतर्गत निवड झालेल्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गंभीर प्रकाराची सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच या योजनेतील शाळांची तातडीने तपासणी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, देशातील शाळांचा सर्वांगीण विकास करून त्यांना ‘आदर्श शाळा’ बनवण्यासाठी पीएमश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाचा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के निधी असतो. याअंतर्गत शाळांना स्मार्ट वर्गखोल्या, डिजिटल सुविधा, आधुनिक क्रीडा साहित्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला जातो. प्रत्येक शाळेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जात असताना, प्रत्यक्ष शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

बीड जिल्ह्यातील स्थिती आणि पालकांचा संताप: महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात ८०० हून अधिक शाळांची या योजनेसाठी निवड झाली असून, त्यात बीड जिल्ह्यातील १३ शाळांचा समावेश आहे. मात्र, हरिनारायण आष्टा येथील पीएमश्री शाळेत मुख्यत्वे गणित आणि विज्ञान या महत्त्वाच्या विषयांचे शिक्षकच उपलब्ध नाहीत. या संदर्भात पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, परंतु कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.

याच उदासीनतेचा निषेध म्हणून १५ जून रोजी जेव्हा जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून ‘शाळा प्रवेशोत्सव’ आणि ‘१०० शाळांना भेटी’ हा उपक्रम राबविला जात होता, नेमक्या त्याच वेळी संतप्त पालक व ग्रामस्थांनी हरिनारायण आष्टा येथील शाळेला थेट कुलूप ठोकून प्रशासनाचा तीव्र निषेध केला. या घटनेमुळे कोट्यवधींचा निधी मिळणाऱ्या पीएमश्री योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील पीएमश्री योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व १३ शाळांची स्वतंत्र चौकशी करावी, रिक्त शिक्षक पदे तातडीने भरावीत आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी आग्रही मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

COMMENTS