Homeताज्या बातम्या

कार्यकर्ते उपेक्षित, वारसदार पुढे? भाजपमध्ये खदखद; खा. गोपछडेंच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह

नांदेड: मराठवाड्यात भाजपच्या संघटनात्मक राजकारणात पुन्हा एकदा अस्वस्थतेची चर्चा रंगू लागली असून, राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या कार्यपद्

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची सार्वजनिक जयंती बीड शहरात प्रथमच; विविध उपक्रमांचे आयोजन
TET पेपरफुटीवरून मुंबईत उग्र आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची युवक काँग्रेसची मागणी
शहीद जवानांच्या वारसांना शेतजमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

नांदेड: मराठवाड्यात भाजपच्या संघटनात्मक राजकारणात पुन्हा एकदा अस्वस्थतेची चर्चा रंगू लागली असून, राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या कार्यपद्धतीवरून पक्षातील काही जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पक्षासाठी झटणार्‍यांच्या वाट्याला प्रतीक्षा आणि आश्वासने, तर मोजक्या मंडळींच्याच वाट्याला संधी व लाभ? असा सवाल आता उघडपणे उपस्थित केला जात आहे.

पक्षाने राज्यसभा सदस्यत्वाच्या माध्यमातून डॉ. गोपछडे यांच्यावर मोठा विश्वास दाखविला. मात्र, त्यानंतर स्थानिक पातळीवर संघटन विस्तार, कार्यकर्त्यांना बळ, विकासकामांसाठी निधी आणि विविध समित्यांमधील प्रतिनिधित्व याबाबत अपेक्षित परिणाम दिसून न आल्याची खंत व्यक्त केली जात आहे. सतत बैठका, दौरे आणि सोशल मीडियावरील सक्रियता दिसते; पण कार्यकर्त्यांच्या हातात नेमके काय आले? असा प्रश्न नाराज गटाकडून उपस्थित केला जात आहे. माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपल्या कन्येला विधान परिषदेत संधी मिळवून दिल्यानंतर आता डॉ. गोपछडे आपल्या मुलाला विविध राजकीय भेटीगाठींमध्ये सक्रियपणे सोबत ठेवत असल्याने भाजपमध्ये नवीन चर्चांना उधाण आले आहे. भविष्यात राजकीय वारसदार तयार करण्यासाठी पावले उचलली जात आहेत का, अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

याचबरोबर, पक्षासाठी वर्षानुवर्षे मेहनत करणार्‍या कार्यकर्त्यांना ना महामंडळांवर संधी मिळत आहे, ना विकासकामांसाठी विशेष निधी उपलब्ध होत असल्याची नाराजी वाढत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा असंतोष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, काही निवडक व्यक्तींना प्रशासकीय माध्यमातून मोठी कामे मिळाल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. जलसंधारण विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामांपासून ते विविध प्रशासकीय लाभांपर्यंत काही मोजक्या मंडळींचेच वर्चस्व असल्याचा आरोप नाराज कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

मराठवाड्यातील सामाजिक प्रतिनिधित्वाच्या राजकारणातही असमतोल असल्याची भावना पुढे येत आहे. हरिभाऊ बागडे आणि रावसाहेब दानवे यांच्यानंतर नव्या पिढीतील मराठा नेतृत्वाला मोठ्या संघटनात्मक पदांवर पुरेशी संधी मिळत नसल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. दरम्यान, या सर्व आरोपांवर खासदार डॉ. अजित गोपछडे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसली, तरी भाजपच्या अंतर्गत राजकारणात वाढणारी खदखद आणि कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता येत्या काळात पक्ष नेतृत्वासाठी नवे आव्हान ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS