बीड : भारतीय संस्कृती आणि संत परंपरेचे विचार जनमानसात रुजवण्याच्या उद्देशाने स्व. झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठानतर्फे यंदाही भव्य संगीतमय कथा महोत्सव

बीड : भारतीय संस्कृती आणि संत परंपरेचे विचार जनमानसात रुजवण्याच्या उद्देशाने स्व. झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठानतर्फे यंदाही भव्य संगीतमय कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे 5 मे ते 11 मे या कालावधीत विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांसाठी उपलब्ध होणार आहे.
गेल्या 25 वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून संत विचारांचा प्रचार-प्रसार सातत्याने केला जात असून, यंदाही भाविकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम सुरू ठेवण्यात आला आहे. सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कथा प्रवक्त्या साध्वी अनुराधा दिदी पंढरपूरकर यांच्या मधुर वाणीतून 5 मे ते 11 मे दरम्यान दररोज सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्राचे संगीतमय निरूपण होणार आहे. तसेच 5 मे ते 8 मे या कालावधीत सायंकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत ह.भ.प. वेदविभूषण उद्बोध महाराज (श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थान, देऊळगावराजा) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्री नवनाथ कथासार’ सादर केला जाणार आहे. अधिकमासानिमित्त 9 मे ते 11 मे या कालावधीत ह.भ.प. गीतांजलीताई झेंडे (अहिल्यानगर) यांच्या सुमधुर निरूपणातून ‘अधिकमास महात्म्य’ या विषयावर दररोज तीन सत्रांमध्ये (सकाळी 11 ते 2, दुपारी 3 ते 6 आणि सायंकाळी 6.30 ते रात्री 9) कथा होणार आहे. भारतीय संस्कृतीत अधिकमासाचे महत्त्व तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. बीड शहरातील भाविकांनी या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्व. झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

COMMENTS