नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी ; जागेचा लिलाव होणार नसल्याचे जाहीर जामखेड : यात्रा भरवण्याच्या जागेबाबत तसेच नागरिकांच्या सुविधा व समस्यांबाबत न

नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी ; जागेचा लिलाव होणार नसल्याचे जाहीर
जामखेड : यात्रा भरवण्याच्या जागेबाबत तसेच नागरिकांच्या सुविधा व समस्यांबाबत नगरपरिषद पदाधिकारी व प्रशासनाला जाणीव आहे. या उत्सवात येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा नगरपरिषदेच्या वतीने पुरविल्या जातील. तसेच शहरातील बीड रोडवरील प्रशस्त असलेल्या एमआयडीसीच्या मैदानावर पंचमीचा आनंदमेळा भरविण्यात येणार आहे, असे नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी सांगितले.
पंचमी निमित्ताने शांतता कमिटीची बैठक तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या वतीने बीड रोडवरील एमआयडीसीच्या जागेवर पंचमी आनंद मेळा भरविण्याची तयारी झाली आहे असे सांगण्यात आले तेव्हा बाजार समितीचे सभापती शरद कारले यांनी सांगितले की बाजार समितीच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून आनंदमेळा भरविण्यात येतो. कोणत्याही प्रकारच्या अडचणी तेथे येत नाहीत. तेव्हा यावर्षीही बाजार समितीच्या आवारात पंचमी आनंद मेळा भरविण्याची त्यांनी मागणी केली. मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत सत्ताधारी व विरोधी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी झाली.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी सांगितले की या उत्सवात नागरिकांच्या आनंदाचा विचार करून नेहमीप्रमाणे या वर्षी आनंदमेळा जागेचा लिलाव होणार नाही. सर्वांच्या सूचनांचा विचार करून निर्णय केला जाईल.
चौकट : सर्वच महिला पदाधिकारी गैरहजर
सदर महत्त्वाच्या बैठकीला मुख्याधिकारी उपस्थित नव्हते. तसेच पंचमी हा सण विशेष करून महिलांचा सण आहे. नगरपरिषद मध्ये पन्नास टक्के महिला पदाधिकारी आहेत. मात्र एवढ्या मोठ्या निर्णय प्रक्रियेत नगराध्यक्षा वगळता एकही महिला पदाधिकारी उपस्थित नव्हते.
महिला आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५०% जागा राखीव मिळाल्या आहेत, ज्याचा मुख्य हेतू महिलांना निर्णयप्रक्रियेत थेट अधिकार देणे हा आहे. मात्र, प्रत्यक्षात महिला पदाधिकारी बैठकांना उपस्थित नसणे हा मोठा चिंतेचा विषय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

COMMENTS