जामखेड : अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर येथे महापालिका कर्मचारी धीरज परदेशी यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ जामखेडमध्ये बंद पाळ
जामखेड : अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर येथे महापालिका कर्मचारी धीरज परदेशी यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ जामखेडमध्ये बंद पाळण्यात आला. मात्र, बंदबाबत पूर्वसूचना नसल्याने सकाळी अचानक दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आल्याने लहान व्यावसायिकांची तारांबळ उडाली. बाहेरगावाहून कामासाठी आलेल्या कामगारांनाही याचा फटका बसला.
सकाळच्या सुमारास काही तरुण मोटारसायकलवरून शहरातील रस्त्यांवर फिरून ‘बंद करा, बंद करा’ असे आवाहन करत होते. अचानक झालेल्या या आवाहनामुळे अनेक छोट्या दुकानदारांना व्यवसाय बंद करावा लागला. बंदची पूर्वकल्पना नसल्याने काही व्यावसायिकांचे नुकसान झाले. तसेच बाहेरगावाहून कामासाठी आलेल्या कामगारांना कामाविना परतावे लागल्याने त्यांच्या ये-जा खर्चाचाही भुर्दंड सहन करावा लागला.
धीरज परदेशी यांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी असून, या घटनेचा निषेध करणे आवश्यक आहे. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, बंद किंवा आंदोलनाबाबत पूर्वसूचना दिल्यास व्यावसायिक आणि नागरिकांना त्यानुसार नियोजन करता येते, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

COMMENTS