पाथर्डी : अहिल्यानगर महापालिकेचा कर्मचारी धीरज परदेशी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी पाथर्डी शहर बंदची हाक देण्यात आली होती. व्यापारी व नागरिकांनी प्

पाथर्डी : अहिल्यानगर महापालिकेचा कर्मचारी धीरज परदेशी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी पाथर्डी शहर बंदची हाक देण्यात आली होती. व्यापारी व नागरिकांनी प्रतिसाद देत शहरात कडकडीत बंद पाळला. सकाळी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढून घटनेचा निषेध केला.
सकाळी साडेदहा वाजता शेवगाव रोड येथून मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. शेवगाव रोड, कोरडगाव चौक, नवी पेठ, क्रांती चौक, अजिंठा चौक, नाईक चौक, अहिल्यानगर रोड या प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी शहर परिसर दुमदुमून गेला.
पाथर्डी शहर बंद असल्याने परिसरातील तसेच तालुक्यातील नागरिकांनी शहराकडे येणे टाळले. हिंदुत्ववादी संघटनांनी दिवसभर बंदचे आवाहन केले होते. दरम्यान, सकल हिंदू समाज, अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने पाथर्डी पोलिसांना निवेदन देण्यात आले.
हिंदू युवक धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगर हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींसह त्यांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन निष्पक्ष, सखोल व पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. हत्येतील सर्व आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करावी, तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा व्हावी, हत्येमागील सूत्रधार किंवा मास्टरमाइंडचा शोध घ्यावा, आरोपींना मदत करणाऱ्यांवरही कारवाई करावी, घटनेची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करावी, तसेच संबंधित आरोपींची घरे व जमिनी उद्ध्वस्त कराव्यात, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
निवेदन पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर यांनी स्वीकारले. यावेळी मुकुंद गर्जे, नगरसेवक अमोल गर्जे, नगरसेवक प्रतीक नांगरे, संजय मरकड, सचिन वायकर, सोमनाथ अकोलकर, नानासाहेब पालवे, बाळासाहेब गीते, सोमनाथ बंग, आशुतोष शर्मा, सारंग मंत्री, चिकू खेडकर, बबलू खोर्दे, भास्कर दराडे आदी उपस्थित होते.

COMMENTS