शेवगाव : माजी सैनिक संघ, शेवगाव तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सैनिक परिवार स्नेहसंमेलनाला माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मोठ

शेवगाव : माजी सैनिक संघ, शेवगाव तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सैनिक परिवार स्नेहसंमेलनाला माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा प्रतिसाद लाभला. रविवारी (दि. ७ जून) शेवगाव येथे हे संमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. संघटनेतील सदस्यांमध्ये परस्पर जिव्हाळा, प्रेम आणि एकोपा वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, असे प्रास्ताविकात संघाचे अध्यक्ष मेजर विनोद शेळके यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. याप्रसंगी भारतीय सैन्यात नव्याने रुजू झालेल्या स्थानिक युवक व युवतींचा विशेष सत्कार करण्यात आला. सुबेदार सुरेश मडके यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन करत व्यसनमुक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. तर अहिल्यानगर येथील आयसीआयसीआय बँकेचे पोटे यांनी पेन्शन पोर्टल व तक्रार निवारण प्रक्रियेबाबत माहिती दिली. पोस्ट मास्टर विनायक शिंदे यांनी पोस्टल लाईफ इन्शुरन्स योजनांची माहिती दिली, तर सुबेदार मेजर अशोक वांढेकर यांनी पाल्यांवरील संस्कारांवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सामाजिक ऐक्य, शिस्त व राष्ट्रीय कर्तव्यभावनेविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर सावळेराम उंदरे होते. महाराष्ट्र गीताने मुख्य कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भोजनानंतर महिलांसाठी मीनाक्षी शिंदे व वैष्णवी गाडेकर यांच्या संयोजनाखाली संगीत खुर्ची व उखाणा स्पर्धा रंगल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक कुसळकर यांनी केले.

COMMENTS