कोपरगाव : सकल आदिवासी समाज, कोपरगाव यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसाची सुरुवात सकाळी १० वाजता कोपरगाव शह

कोपरगाव : सकल आदिवासी समाज, कोपरगाव यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसाची सुरुवात सकाळी १० वाजता कोपरगाव शहरातील आठवडे बाजार येथे महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर सकाळी ११ वाजता टाकळी येथील एकलव्य आश्रमशाळेत सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच निसर्गसंवर्धनाचा संदेश देत आश्रमशाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सांजवेळी ६.०० वाजता समता नगर येथील योगाभवन येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत सेवक बँक (सातारा) चे संचालक दीपक भोये यांनी केले, तर सूत्रसंचालन के.के.गवळी यांनी केले. या वेळी समाजबांधवांना प्रबोधन करताना आदिवासी साहित्यिक व व्याख्याते संजय साबळे आणि निखिल सलामे यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “आदिवासी समाजाला आज शिक्षणाची नितांत गरज आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिकलेल्या समाजबांधवांनी मागे वळून पाहत समाजातील शेवटच्या घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, तरच आपला आदिवासी समाज पुढे जाऊ शकेल.” यावेळी शैक्षणिक, क्रीडा व विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच समाजात प्रदीर्घ काळ शासकीय सेवा देऊन निवृत्त झालेल्या व निवृत्त होण्याच्या मार्गावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

COMMENTS