बीड: चित्रपटसृष्टीतील अजरामर गायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या ३१ जुलै रोजी 'एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम' या गीत-संगीताच्या मोफ

बीड: चित्रपटसृष्टीतील अजरामर गायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या ३१ जुलै रोजी ‘एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम’ या गीत-संगीताच्या मोफत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीतमय मेजवानीचा रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजक तथा गायक एम. एम. शेख, मॅनेजमेंट हेड युसूफ पठाण आणि मुक्त पत्रकार एस. एम. युसूफ यांनी केले आहे.
गीत-संगीताचा हा विशेष कार्यक्रम पीस बुक डेपोचे संचालक, गायक तथा आयोजक एम. एम. शेख दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सादर करत आहेत. या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीत विशारद मज़हरूद्दीन शेख, डॉ. प्रियंका देशमाने (एम.ए. पीएच.डी. म्युझिक), सैलानी शेख, गायक तथा सूत्रसंचालक आकाश जाधव, अस्मिता सुरवसे, ललिता लांडगे, संध्या जाधव, निशा उजगरे आणि मुजीब सय्यद हे कलाकार आपली गायन कला सादर करणार आहेत. साऊंड सिस्टिमची जबाबदारी नेहमीप्रमाणे कृष्णा पांगरे सांभाळणार आहेत.
एम. एम. शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम विनाखंड सादर करत आहेत. दरवर्षी या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होणारे सर्व कलाकार विनामूल्य हा कार्यक्रम आयोजित करून मरहूम मोहम्मद रफी साहेबांना संगीतमयी श्रद्धांजली अर्पण करतात.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सदाबहार गीतांचा मोफत कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कॅनॉल रोड येथे सायंकाळी ७:०० वाजता पार पडणार आहे. तरी जिल्हाभरातील संगीतप्रेमी व रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

COMMENTS