Homeताज्या बातम्या

अन्यथा १५ ऑगस्टला पालकमंत्र्यांना काळे झेंडे! हुले कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

बीड : पालवन चौक-पालवन-देवराई या सुमारे ५० ते ६० गावांची जीवनवाहिनी असलेल्या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामातील कथित भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे बां

लुधियानामध्ये गोळ्या झाडून युवकाची हत्या
कचरा टेंडरवरून पुण्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक; पालिकेच्या मुख्य गेटवर चढून जोरदार निदर्शने!
पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार; महापालिकेकडून १२ ‘मिसिंग लिंक’ रस्ते प्रकल्पांना गती

बीड : पालवन चौक-पालवन-देवराई या सुमारे ५० ते ६० गावांची जीवनवाहिनी असलेल्या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामातील कथित भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे बांधकाम, मुदतीचा भंग आणि अपूर्ण कामाची बिले मंजूर करण्याच्या प्रयत्नांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतिक उर्फ अजय सरवदे यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत संबंधित कंत्राटदार हुले कन्स्ट्रक्शन, पाटोदा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, २९ मे २०२५ रोजी कार्यारंभ आदेश मिळालेल्या या कामाची मुदत २९ मे २०२६ रोजी संपली असतानाही संपूर्ण वर्षभर काम प्रलंबित ठेवण्यात आले. मुदत संपण्याच्या काही दिवसांपूर्वी केवळ दिखाऊ स्वरूपात काम सुरू करून एका बाजूचे अपूर्ण काम करण्यात आले, तर दुसरी बाजू पूर्णपणे सोडून देण्यात आली. त्यानंतर संबंधित अधिकार्‍यांच्या संगनमताने डिसेंबर २०२६ पर्यंत बेकायदेशीर मुदतवाढ दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर काळ्या मातीचा वापर, कडेला आवश्यक भराव न टाकणे, मंजूर आराखड्याप्रमाणे काम न करणे, माहिती फलक न लावणे, अपूर्ण कामाची मोजमाप पुस्तिका भरून बिले मंजूर करण्याचा प्रयत्न अशा गंभीर अनियमिततांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

यापूर्वीही नवगण कॉलेज चौक-पंचशील नगर-पालवन चौक या रस्त्याचे कथित निकृष्ट दर्जाचे काम याच कंत्राटदाराने केले होते. त्या वेळी संतप्त नागरिकांनी तत्कालीन पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आंदोलन केले होते आणि एका युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची आठवणही तक्रारीत करून देण्यात आली आहे. तक्रारीमध्ये मुदतवाढ तात्काळ रद्द करणे, करारानुसार दंडात्मक कारवाई करणे, अपूर्ण कामाची कोणतीही बिले अदा न करणे, वरिष्ठ तांत्रिक समितीकडून कोअर कट व मटेरियल टेस्ट करणे, दोषी अधिकार्‍यांवर विभागीय चौकशी सुरू करणे आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

सरवदे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, तक्रार प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसांत प्रत्यक्ष काम पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाही, तर १५ ऑगस्ट रोजी पालवन, पिंपळवाडी, डोकेवाडा, बेलखंडी, मंजिरी, धुमाळवाडीसह ५० ते ६० गावांतील नागरिकांच्या उपस्थितीत तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येईल. या आंदोलनातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे पालवन-देवराई रस्ता प्रकरण आता जिल्ह्यातील एक मोठा सार्वजनिक आणि राजकीय मुद्दा बनण्याची चिन्हे दिसत आहेत.

COMMENTS