नांदेड : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालय, शासन, विविध वैद्यकीय पद्धतींचे डॉक्टर आणि समाजाने हा प

नांदेड : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालय, शासन, विविध वैद्यकीय पद्धतींचे डॉक्टर आणि समाजाने हा प्रश्न न्यायिक दृष्टिकोनातून, सामंजस्याने व समन्वयाने सोडविणे आवश्यक आहे, असे मत फेस्कॉमचे उत्तर मराठवाडा प्रादेशिक अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी व्यक्त केले.
आयएमए आणि मार्डच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपाची उच्च न्यायालयाने वेळीच दखल घेत हस्तक्षेप केला. त्यानंतर संबंधित डॉक्टर संघटनांनी संप मागे घेतला. मात्र, भविष्यात अशा प्रकारचा संघर्ष निर्माण होऊ नये, यासाठी मूळ प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.
भारतामध्ये अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, दंतचिकित्सा, नर्सिंग आणि फिजिओथेरपी अशा विविध वैद्यकीय व आरोग्य प्रणालींचे स्वतंत्र शैक्षणिक अभ्यासक्रम, नोंदणी व्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणा आहेत. या सर्व पद्धतींमध्ये प्रवेश गुणवत्ता व निर्धारित नियमांनुसार होतो. प्रत्येक प्रणालीला स्वतःची उपचारपद्धती, कार्यक्षेत्र आणि काही मर्यादा आहेत. कुठलीही वैद्यकीय पद्धती परिपूर्ण नाही. प्रत्येक प्रणालीचे स्वतःचे महत्त्व आणि मर्यादा आहेत. रुग्णाचे आरोग्य व जीवितरक्षण हा सर्वच वैद्यकीय पद्धतींचा केंद्रबिंदू असला पाहिजे, असे डॉ. वैद्य यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण आणि दुर्गम भागात अॅलोपॅथीच्या तुलनेत बीएएमएस, बीएचएमएस आणि युनानी वैद्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. हे वैद्य त्यांच्या कार्यक्षेत्राच्या मर्यादा लक्षात घेऊन प्राथमिक उपचार करतात आणि गंभीर रुग्णांना तज्ज्ञांकडे पाठवितात. त्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत विविध वैद्यकीय प्रणालींमध्ये समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्याच्या वादाच्या केंद्रस्थानी होमिओपॅथिक डॉक्टरांच्या नोंदणीचा प्रश्न असल्याचे सांगत, प्रत्येक वैद्यकीय प्रणालीची स्वतंत्र नोंदणी व नियमन व्यवस्था कायम ठेवून शासनाने स्पष्ट धोरण निश्चित करावे, अशी अपेक्षा डॉ. वैद्य यांनी व्यक्त केली. उच्च न्यायालय, शासन आणि सर्व वैद्यकीय प्रणालीतील डॉक्टरांनी सामंजस्याने हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा. रुग्णहितापेक्षा कोणताही वाद मोठा नसावा, असे आवाहन त्यांनी केले.

COMMENTS