बीड : जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासकामांसाठी तत्कालीन पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून शासन


बीड : जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासकामांसाठी तत्कालीन पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून शासन आदेशही निर्गमित केला. मात्र दुसरीकडे जालना रोड ते जिल्हा क्रीडा संकुल या महत्त्वाच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, निधी उपलब्ध असतानाही रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने खेळाडू, पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सत्ताधारी आणि नगरपालिका प्रशासनाने केवळ उद्घाटने व सोशल मीडियावरील फोटोसेशनची स्टंटबाजी न करता प्रत्यक्ष विकासकामे पूर्ण करावीत, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार, जिल्हाधिकारी आणि बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे केली आहे. सोमवार रोजी नगरपरिषद कार्यालयासमोरील रस्त्यावर क्रिकेट खेळुन लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येणार आहे.
बीडचे तत्कालीन पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी जिल्हा क्रीडा संकुलास भेट देऊन खेळाडू व क्रीडाप्रेमी नागरिकांशी संवाद साधला होता. क्रीडा संकुलातील विविध समस्यांची पाहणी केल्यानंतर विकासकामांसाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी २४ कोटी ९५ लाख रुपयांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या निधीत सिंथेटिक ॲथलेटिक ट्रॅक, फुटबॉल व हॉकी मैदान, व्हॉलीबॉल, कबड्डी व खो-खो मैदान, इनडोअर हॉलचे अद्ययावतीकरण, वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्याचे बांधकाम, रेन वॉटर हार्वेस्टिंगसह विविध क्रीडा सुविधांचा समावेश आहे. बीड शहरात वास्तव्यास असलेले राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे अनेक होतकरू खेळाडू नियमितपणे जिल्हा क्रीडा संकुलात सरावासाठी येतात. मात्र जालना रोड ते जिल्हा क्रीडा संकुल हा महत्त्वाचा रस्ता अत्यंत खराब झाला असून, जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्याला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. पाण्याखालील खड्ड्यांची खोली वाहनचालकांना लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. खेळाडू दुचाकीवरून घसरून पडणे, पाय मुरगळणे यासारख्या घटना घडत असून, पालकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. रस्त्याच्या परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने खेळाडूंच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
बीड शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन तत्कालीन पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी शहरातील २२ रस्त्यांसह एकूण ३० विकासकामांसाठी सुमारे २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. जानेवारी २०२६ मध्ये या कामांसाठी निधी उपलब्ध झाला. उन्हाळ्यात वर्कऑर्डर झालेल्या कामांची पावसाळ्यात उद्घाटने करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. निधी मंजूर असूनही विकासकामे वेळेत पूर्ण होत नसतील, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत सत्ताधारी आणि नगरपालिका प्रशासनाने ढिसाळ नियोजन झटकून जालना रोड ते जिल्हा क्रीडा संकुल रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.
२४ कोटी ९५ लाखांचा निधी कुठे खर्च होणार? सिंथेटिक ॲथलेटिक ट्रॅक, फुटबॉल-हॉकी मैदान, व्हॉलीबॉल, कबड्डी व खो-खो मैदान, इनडोअर हॉल अद्ययावतीकरण, वसतिगृहाचा तिसरा मजला आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग.
खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर जालना रोड ते जिल्हा क्रीडा संकुल रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. सरावासाठी जाणाऱ्या खेळाडूंच्या दुचाकी घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत.
उद्घाटनांची स्टंटबाजी नको; कामे पूर्ण करा! निधी मंजूर आणि वर्कऑर्डर झाल्यानंतरही कामे रखडत असतील तर जबाबदारी निश्चित करा. सत्ताधारी व नगरपालिका प्रशासनाने सोशल मीडिया फोटोसेशनपेक्षा प्रत्यक्ष विकासकामांना प्राधान्य द्यावे, असा इशारा डॉ. गणेश ढवळे यांनी दिला आहे.

COMMENTS