बीड : सद्गुरु किसान बाबा महाराज व गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांनी आपल्या हृदयामध्ये भगवंत साठविला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक भक्ताने

बीड : सद्गुरु किसान बाबा महाराज व गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांनी आपल्या हृदयामध्ये भगवंत साठविला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक भक्तानेही आपल्या हृदयात हरी साठवावा, असे प्रतिपादन ह.भ.प. कृष्णा महाराज राऊत यांनी अभंग विवेचनात केले.
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे दि. 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प. कृष्णा महाराज राऊत यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले. कीर्तनामध्ये संत तुकाराम महाराज यांचा सांठविला हरी, जींहीं हृदयमंदिरी हा अभंग घेऊन त्यांनी सखोल विवेचन केले. कृष्णा महाराज म्हणाले की, जो मनुष्य आपल्या हृदयामध्ये भगवंत साठवतो, त्याला जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते. भक्ती इतकी प्रगाढ असावी की भगवंतही आपल्या भक्ताच्या सेवेत राहतो. संत परंपरेत असे अनेक उदाहरणे आहेत, जसे की एकनाथ महाराज यांच्या सेवेत भगवंत राबत होता. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, संत एकनाथ महाराजांनंतर शांतीब्रह्म ही उपाधी फार थोड्या संतांना शोभून दिसते. त्यामध्ये कुरेकर बाबा व श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथील शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांचा समावेश होतो. गोरक्षनाथ टेकडीचे आजचे वैभव हे साधू बाबा महाराज, किसान बाबा महाराज आणि नवनाथ बाबा महाराज यांच्या कष्ट, त्याग आणि तपश्चर्येमुळेच संभवले असल्याचे त्यांनी नमूद केले. या कीर्तन सोहळ्यास टाळकरी, माळकरी, भजनी मंडळी, मृदुंग वादक, विणेकरी तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर पौर्णिमेप्रमाणे या बुद्ध पौर्णिमेनिमित्त जुजगव्हाण ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

COMMENTS