देवळाली प्रवरा : बदलत्या काळात परंपरा जपणारे हात कमी होत असताना येथील सख्खे मित्र मुकुंद उर्फ राजू बापूसाहेब चव्हाण (वय ६६) आणि तान्हाजी उर्फ का

देवळाली प्रवरा : बदलत्या काळात परंपरा जपणारे हात कमी होत असताना येथील सख्खे मित्र मुकुंद उर्फ राजू बापूसाहेब चव्हाण (वय ६६) आणि तान्हाजी उर्फ कांता किसन कदम पाटील (वय ६९) यांनी गेल्या तब्बल ३० वर्षांपासून कीर्तन, दिंडी व सप्ताह परंपरेत निष्ठेने कार्य करत एक मानाची ओळख निर्माण केली आहे.
कीर्तन परंपरेतील भालदार व चोपदार या महत्त्वपूर्ण भूमिका समर्थपणे पार पाडत त्यांनी अनेक कीर्तनकार आणि भाविकांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या सादरीकरणामुळे कीर्तनाला शिस्त, दिमाख आणि भक्तीभावाची जोड मिळते. त्यामुळे ते आज परिसरातील कीर्तन सोहळ्यांचे आकर्षण ठरत आहेत.
विशेष म्हणजे, दोघेही मित्र एकाच संस्थेत कार्यरत होते. कांता कदम पाटील यांनी देवळाली प्रवरा सोसायटीत ३५ वर्षे सेवा बजावली, तर राजू चव्हाण यांनी ३७ वर्षे प्रामाणिकपणे कार्य केले. नोकरीसोबतच त्यांनी धार्मिक सेवेची परंपरा अखंड जपली.
दोघांनाही धार्मिक संस्कारांचा वारसा घरातूनच लाभला. राजू चव्हाण यांचे आई-वडील प्रयागाबाई व स्व. बापूसाहेब गंगाधर चव्हाण हे पंढरपूरची वारी करणारे भाविक होते. तर कांता कदम पाटील यांच्या आई स्व.आसराबाई व वडील स्व. किसन नारायण कदम कुटुंबावर संत परंपरेचा ठसा असून त्यांनीही पंढरपूरची आषाढी वारी कुटुंबियांसह घडवून आणली आहे.
कीर्तन परंपरेत भालदार हा दंड किंवा भाला घेऊन उभा राहून कार्यक्रमाला राजेशाही दिमाख देतो, तर चोपदार हा संपूर्ण कार्यक्रमाची शिस्त, वेळ व नियोजन सांभाळतो. या दोन्ही भूमिका कीर्तनाच्या प्रभावात मोठी भर घालणाऱ्या मानल्या जातात. चव्हाण आणि कदम यांनी या भूमिकांमध्ये केवळ औपचारिकता न ठेवता त्यात भक्तीभाव, समर्पण आणि आत्मीयता मिसळली आहे.
शेती, कुटुंब आणि समाजसेवा यांचा समतोल राखत त्यांनी भक्तीसेवा अखंड सुरू ठेवली आहे. कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळेच त्यांचा उत्साह आजही टिकून आहे.
आजच्या आधुनिक युगात पारंपरिक धार्मिक सेवा जपणारे व्यक्ती दुर्मिळ होत असताना, चव्हाण आणि कदम या दोघा मित्रांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरत आहे. त्यांनी केवळ परंपरा जपली नाही, तर नव्या पिढीसमोर एक प्रेरणादायी आदर्शही निर्माण केला आहे.
देवळाली प्रवरा गावासह संपूर्ण परिसरात त्यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त होत असून, भक्ती, शिस्त आणि संस्कृतीचा सुंदर संगम घडवणारे हे दोघे आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

COMMENTS