बीड : केज-अंबाजोगाई रोडवर पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून लुटणार्या अट्टल गुन्हेगारांना केज पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करून धाडसी कामगिरी बज

बीड : केज-अंबाजोगाई रोडवर पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून लुटणार्या अट्टल गुन्हेगारांना केज पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करून धाडसी कामगिरी बजावली आहे. थरारक पाठलाग करत दोन आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याकडून लुटीतील रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जून 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास धनराज नामदेव सूर्यवंशी (वय 30, रा. पिसेगाव, ता. केज) हे आपल्या पत्नीसह मोटारसायकलने गावाकडे जात होते. पिसेगाव फाट्यापासून काही अंतरावर एका मोटारसायकलवरून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत धमकावून त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. मात्र, सूर्यवंशी दाम्पत्याने आरडाओरडा केल्याने घाबरलेल्या चोरट्यांनी घटनास्थळीच स्वतःची एक मोटारसायकल सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने, सहायक फौजदार फुलचंद सानप, पोलीस नाईक पुरुषोत्तम शेप, पोलीस अंमलदार गोविंद मुंडे, सहायक फौजदार शंभुदेव दराडे तसेच डीबी पथकाचे अनिल नागरगोजे व देवगुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपींनी सोडून दिलेली मोटारसायकल (एमएच-45 क्यू-8183) ताब्यात घेतली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींची ओळख निश्चित करण्यात आली. दरम्यान, आरोपी केज शहरातून कळंब रोडकडे मोटारसायकलवरून जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने आणि पोलीस अंमलदार अनिल नागरगोजे यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी पोलिसांना गुंगारा देत भरधाव वेगाने पळ काढला.यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. हॉटेल संतोष पॅलेससमोर आरोपींनी आपली मोटारसायकल (एमएच-44 ई-3576) सोडून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी झडप घालत दोघांना ताब्यात घेतले. शेषेराव हिम्मत शिंदे (वय 50, रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव), भिमा आबा काळे (वय 19, रा. दत्तनगर, ढोकी, जि. धाराशिव) मुख्य आरोपी शेषेराव शिंदे याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून गुन्ह्यातील लुटलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली. या गुन्ह्यातील अन्य दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. फिर्यादी धनराज सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 371/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 309(4) व 309(6) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार फुलचंद सानप करत आहेत. ही यशस्वी कारवाई बीड जिल्ह्याच्या प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहायक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली. पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर लूटमार प्रकरणाचा जलद छडा लागल्याने नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.

COMMENTS