सुपा : पारनेर तालुक्यात शेतरस्ते व जमिनीच्या मोजणीसंदर्भातील सुमारे २,५०० हून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना कर

सुपा : पारनेर तालुक्यात शेतरस्ते व जमिनीच्या मोजणीसंदर्भातील सुमारे २,५०० हून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षकांना निवेदन देत तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे.
शेतरस्त्यांच्या हद्दी स्पष्ट नसल्यामुळे गावोगावी वाद निर्माण होत असून शेतीच्या कामात अडथळे येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक तसेच मानसिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या अपेक्षेने भूमी अभिलेख कार्यालयात येत असले तरी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात सर्व प्रलंबित शेतरस्ता व मोजणी प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, यासाठी विशेष मोहीम राबवून अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत, प्रत्येक प्रकरणासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी, तसेच पूर्ण झालेल्या प्रकरणांचा अहवाल महसूल विभागाकडे सादर करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय पारनेर कार्यालयात कायमस्वरूपी उपअधीक्षक व पुरेसे मोजणी कर्मचारी नियुक्त करावेत आणि “रोड मॉडेल व्हिलेज” उपक्रमांतर्गत सर्व रस्त्यांची हद्द निश्चित करून शून्य प्रलंबित उद्दिष्ट साध्य करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या निवेदनाची दखल न घेतल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता जिल्हा अधीक्षकांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शरद पवळे यांनी दिला आहे. त्यांनी हा इशारा जिल्हाधिकारी पंकज आशिया तसेच जिल्हा अधीक्षक संजय कुंभार यांनाही निवेदनाद्वारे कळविला आहे.

COMMENTS