राज्यात सध्या अनुभवास येत असलेली उष्णतेची तीव्र लाट ही केवळ ऋतूमानातील साधी बदलाची बाब राहिलेली नाही; ती आता एक गंभीर पर्यावरणीय आणि सार्वजनिक आर

राज्यात सध्या अनुभवास येत असलेली उष्णतेची तीव्र लाट ही केवळ ऋतूमानातील साधी बदलाची बाब राहिलेली नाही; ती आता एक गंभीर पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनली आहे. विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली असून अनेक शहरांमध्ये 45 अंश सेल्सिअसच्या पुढे पारा गेला आहे. अशा परिस्थितीत दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून नागरिकांना आरोग्याच्या गंभीर धोक्यांचा सामना करावा लागत आहे. तापमान ही एका दिवसांत निर्माण झालेले संकट नाही. शाश्वत विकासाकडे दुर्लक्ष करत आपण जंगले उद्धवस्त करत चाललो आहेत. सिमेंटंची जंगले वाढत चालली आहे. त्या तुलनेने वृक्ष आच्छादन कमी होत चालले आहे. परिणामी मानवी जीवन संकटात सापडतांना दिसून येत आहे. 2015 मध्ये करण्यात आलेला पॅरिस करार हा जागतिक हवामान बदलाचा सामना करण्यासाठी केलेला एक ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय करार आहे. फ्रॉन्समध्ये झालेल्या हवामान परिषदेत जागतिक तापमानवाढ 2 डिग्री सेल्सियस पेक्षा कमी ठेवणे, शक्य असल्यास ती 1.5डिग्री पर्यंत मर्यादित ठेवणे, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, या बाबींवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले होते. मात्र आजपर्यंत आपणच नव्हे तर जगातील कोणत्याही देशाने या कराराला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे जागतिक तापमानवाढ झपाट्याने वाढतांना दिसून येत आहे. भारत देखील त्याला अपवाद नाही. वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या मूलभूत गरज पूर्ण करतांना निसर्गावर ताण येणारच. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा र्हास होत चालला असून भारतात देखील तापमान वाढ होतांना दिसून येत आहे.
उन्हाळा हा भारतात नेहमीच कडक असतो, मात्र यंदाची उष्णता नेहमीपेक्षा अधिक तीव्र आणि दीर्घकाळ टिकणारी दिसून येते. हवामानातील बदल, वाढते शहरीकरण, झपाट्याने होणारी वृक्षतोड आणि औद्योगिकीकरण यामुळे उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र होत आहे. शहरांमधील काँक्रीटचे जंगल उष्णता साठवून ठेवते, ज्यामुळे रात्रीही तापमान कमी होत नाही. यामुळे नागरिकांना विश्रांती मिळत नाही आणि उष्णतेचा परिणाम अधिक वाढतो. विदर्भातील अकोला, अमरावती यांसारख्या शहरांमध्ये तापमानाने धोकादायक पातळी गाठली आहे. सतत 43 ते 46 अंशांच्या दरम्यान राहणार्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसते, जे परिस्थितीची गंभीरता दर्शवते. मराठवाड्यातील परभणी येथे उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत चिंताजनक आहे. तसेच लातूर जिल्ह्यात लहान बालकाचा मृत्यू झाल्याने ही परिस्थिती किती भीषण आहे हे स्पष्ट होते. उष्माघात हा या उष्णतेचा सर्वात गंभीर परिणाम आहे. शरीराचे तापमान नियंत्रण यंत्रणा अपयशी ठरल्यास जीवाला धोका निर्माण होतो. डोकेदुखी, चक्कर येणे, उलट्या, थकवा ही लक्षणे दिसू लागतात. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेच्या काळात विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही महत्त्वाचे उपाययोजना केल्या आहेत. काही ठिकाणी शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महानगरपालिकांकडून मुख्य चौकांमध्ये पाणी शिंपडण्याची मोहीम राबवली जात आहे, जेणेकरून उष्णतेचा प्रभाव कमी होईल. तसेच नागरिकांना दुपारच्या वेळेस घराबाहेर न पडण्याचे, पुरेसे पाणी पिण्याचे आणि डोके झाकून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, केवळ प्रशासनाच्या उपाययोजना पुरेशा नाहीत. नागरिकांनीही स्वतःची जबाबदारी ओळखून वागणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात काही साधे बदल करून उष्णतेचा परिणाम कमी करता येऊ शकतो. हलके, सैल आणि फिकट रंगाचे कपडे परिधान करणे, थेट उन्हात जाणे टाळणे, नियमित पाणी पिणे, फळे आणि द्रवपदार्थांचे सेवन वाढवणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याशिवाय, समाजाने एकत्र येऊन दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देणे गरजेचे आहे. वृक्षारोपण हा त्यातील सर्वात प्रभावी उपाय आहे. झाडे केवळ सावली देत नाहीत, तर वातावरणातील तापमानही कमी करतात. शहरांमध्ये हरित क्षेत्र वाढवणे, पाण्याचे स्त्रोत जतन करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे हे काळाची गरज आहे. हवामान बदल हा या समस्येचा मूळ कारण आहे. जागतिक तापमानवाढीमुळे अशा उष्णतेच्या लाटा अधिक वारंवार आणि तीव्र होत आहेत. त्यामुळे केवळ स्थानिक पातळीवर नव्हे, तर जागतिक पातळीवरही प्रयत्न करणे आवश्यक आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे, अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे आणि पर्यावरणीय धोरणे प्रभावीपणे राबवणे हे अत्यंत गरजेचे आहे. आजची ही उष्णतेची लाट ही भविष्यातील अधिक गंभीर संकटाची पूर्वसूचना आहे. जर आपण आत्ताच जागरूक झालो नाही, तर येणार्या काळात परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने, प्रशासनाने आणि उद्योगांनी एकत्रितपणे काम करून या समस्येवर उपाय शोधणे आवश्यक आहे. शेवटी, उष्णतेच्या या संकटाकडे केवळ नैसर्गिक घटना म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. ही मानव निर्मित समस्येची परिणती आहे आणि तिचे समाधानही आपल्या हातातच आहे. योग्य वेळी योग्य पावले उचलली, तर आपण या संकटावर मात करू शकतो आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित आणि संतुलित पर्यावरण निर्माण करू शकतो.

COMMENTS