Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

आखातात युद्धाचा भडका! इराणकडून भारतीय खलाशी असलेल्या टँकरवर गोळीबार

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा वणवा आता अधिकच भडकला असून, त्याचा फटका भारतीय खलाशांना बसला आहे. ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ इराणने एका तेल

अमेरिका-इराणची पुढील चर्चा जिनिव्हात होण्याची शक्यता
पाकिस्तानात पेट्रोल 458, डिझेल 520 रुपयांच्या पुढे
युद्ध थांबणार नसल्याचा ट्रम्प यांचा इशारा; अमेरिकेचे विमान पाडल्यानंतर दोन्ही देशांत चर्चा ठप्प

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा वणवा आता अधिकच भडकला असून, त्याचा फटका भारतीय खलाशांना बसला आहे. ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ इराणने एका तेल टँकरवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या जहाजावर १२ भारतीय खलाशी तैनात होते.

होर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती देशांमधील जहाज वाहतूक सध्या धोक्याच्या छायेत आहे. इराणने टोगो देशाच्या ‘MT Chiron’ (एमटी चिरॉन) या केमिकल टँकरवर हल्ला केला. ओमानमधील शिनास बंदर हद्दीजवळ इराणी कोस्ट गार्डने या जहाजाला अडवून इशारा म्हणून थेट गोळीबार केला. या जहाजावर १२ भारतीय कर्मचारी असून त्यांच्या सुरक्षेबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

सुदैवाने, या भीषण घटनेत सर्व भारतीय कर्मचारी सुखरूप असल्याची माहिती भारतीय नौवहन मंत्रालयाने दिली आहे. मात्र, या हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर तेल पुरवठा आणि सागरी व्यापारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इराणने आधीच इशारा दिला होता की, परवानगीशिवाय प्रवास करणाऱ्या जहाजांवर कारवाई केली जाईल.

दुसरीकडे, अमेरिका आणि इराणमधील ‘शांती वार्ता’ पूर्णपणे ठप्प झाली आहे. पाकिस्तानातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर इराणने अमेरिकेसमोर एक नवा प्रस्ताव ठेवला आहे. “आधी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा आणि युद्ध संपवण्यासाठी पावले उचला, अणु कार्यक्रमावर नंतर चर्चा करू,” असा पवित्रा इराणने घेतला आहे.

मात्र, जोपर्यंत दोन्ही देशांमध्ये ठोस करार होत नाही, तोपर्यंत आखातातील हा धोका कायम राहण्याची भीती आहे. भारतीय खलाशांवरील या हल्ल्याने भारताची चिंता वाढवली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS