अरुणाचल प्रदेश: भारत आणि चीन यांच्यातील सीमा वाद दिवसेंदिवस अधिक चिघळत चालला आहे. काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांच्या सीमेवर मोठी झडप झाली होती,

अरुणाचल प्रदेश: भारत आणि चीन यांच्यातील सीमा वाद दिवसेंदिवस अधिक चिघळत चालला आहे. काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांच्या सीमेवर मोठी झडप झाली होती, ज्यामध्ये दगडफेक आणि सैनिकांना नदीत फेकून देण्यासारखे प्रकार घडले होते. या तणावाच्या पार्श्वभूमीवर, आता अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरून भारतासाठी एक अत्यंत चिंताजनक आणि वाईट बातमी समोर येत आहे. चीनच्या सैन्याने भारतीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात कब्जा केल्याचा दावा स्थानिक नाह आदिवासी समूहाने केला आहे.
सुबनसिरी जिल्ह्यातील ‘नाह वेलफेअर सोसायटी’ या आदिवासी संघटनेने जिल्हा प्रशासनाला अधिकृत माहिती देत, वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (LAC) चिनी सैन्याने भारतीय जमिनीवर ताबा मिळवल्याचे म्हटले आहे.
गेल्या ६ वर्षांत चिनी सैन्याची वेगाने घुसखोरी
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, नाह वेलफेअर सोसायटीने दावा केला आहे की, गेल्या १० ते १५ वर्षांपासून चीनचे सैन्य हळूहळू पुढे सरकत होते. मात्र, २०२० पासून त्यांनी अत्यंत वेगाने भारतीय जमिनीवर कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. ही जमीन स्थानिक आदिवासींच्या पूर्वजांची असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
नाह वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष केरू चादर यांनी या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले, “आमचा भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास आहे, ते आमच्या जमिनीचे रक्षण करत आहेत. मात्र, ताक्सिंग क्षेत्रात चिनी पीएलए (PLA) अत्यंत वेगाने पुढे सरकत आहे, जे खूप घातक आहे. प्रत्येक दिवशी आपली जमीन चीनच्या ताब्यात जात असून, चिनी सैन्याने तेथे रस्ते आणि स्वतःचे सैन्य कॅम्प (Military Camps) उभारण्यास सुरुवात केली आहे.”
चीनकडून अरुणाचल प्रदेशवर सातत्याने दावा
अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहे. मात्र, चीन गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगत आला आहे. चीनने अनेकदा आपल्या अधिकृत नकाशांमध्ये अरुणाचलमधील गावे स्वतःच्या हद्दीत दाखवली आहेत. अशातच आता थेट भारतीय जमिनीवर कब्जा केला जात असल्याचा दावा समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या वाढत्या घुसखोरीला आता भारतीय सैन्य नक्की काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यामुळे भारत-चीनमधील लष्करी तणाव पुन्हा एकदा टोकाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

COMMENTS