चिखलदरा: मेळघाटातील चिखलदरा परिसरात अंधश्रद्धेतून नवजात बालिकेवर अमानुष आणि धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. रेठ्याखेडा गावात केवळ १५

चिखलदरा: मेळघाटातील चिखलदरा परिसरात अंधश्रद्धेतून नवजात बालिकेवर अमानुष आणि धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. रेठ्याखेडा गावात केवळ १५ दिवसांच्या बालिकेच्या पोटावर सूज आल्याने उपचाराच्या नावाखाली तिच्या पोटावर तप्त विळह्याचे ११ ते १२ चटके देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून अंधश्रद्धाविरोधातील जनजागृतीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालिकेच्या पोटावर सूज असल्याने तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र, गावातील एका ज्येष्ठ महिलेने पारंपारिक समजुतींवर विश्वास ठेवत चुलीवर विळहा तापवून बालिकेच्या पोटावर वारंवार चटके दिले. स्थानिक भागात या प्रकारच्या अघोरी उपचार पद्धतीला “डम्मा” असे संबोधले जाते. या अमानुष प्रकारामुळे बालिकेला असह्य वेदना झाल्या आणि तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्यावर आवश्यक उपचार सुरू केले असून तिच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच चिखलदरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली. बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मेळघाटातील काही दुर्गम भागांत लहान मुलांच्या पोटदुखी, पोटफुगी किंवा इतर किरकोळ आजारांवर अशा प्रकारचे अंधश्रद्धाजन्य उपचार आजवर केले जात असल्याचे वास्तव या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या चटक्यांमुळे नवजात बालकांच्या त्वचेला गंभीर इजा होऊ शकते. संसर्गाचा (Infection) धोका वाढण्याबरोबरच त्यांच्या आरोग्यावर दीर्घकालीन दुष्परिणामही होऊ शकतात. गेल्या दोन वर्षांत मेळघात परिसरात अशा स्वरूपाची उघडकीस आलेली ही तिसरी घटना असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्यविषयक जनजागृती आणि दुर्गम भागांमध्ये वैद्यकीय सुविधांचा अधिक प्रभावी प्रसार करण्याची आवश्यकता पुन्हा एकदा व्यक्त होत आहे.

COMMENTS