नांदेड: शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केलेल्या ‘ऑपरेशन तुडवा’ या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा कमालीचे तापले आहे. या वक्तव

नांदेड: शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केलेल्या ‘ऑपरेशन तुडवा’ या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा कमालीचे तापले आहे. या वक्तव्याला हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ठाकरे गटाला थेट आव्हान दिले आहे. “जास्तच खुमखुमी असेल तर पुढे या, एकदा होऊनच जाऊ द्या,” अशा कडक शब्दांत त्यांनी इशारा देत संघर्षाची भाषा करणार्यांना जशास तसे उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे.
वरुण सरदेसाईंवर वादग्रस्त वक्तव्य
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार आष्टीकर यांनी ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. वरुण सरदेसाई यांना केवळ उद्धव ठाकरे यांच्यामुळे किंमत आहे, अन्यथा त्यांना रस्त्यावर मारले असते, असे वादग्रस्त वक्तव्य आष्टीकर यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात एका नव्या मोठ्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.
सत्तेत राहूनच विकास शक्य; भूमिकेचे समर्थन
आपल्या राजकीय भूमिकेचे समर्थन करताना आष्टीकर म्हणाले की, मी कोणताही निर्णय एकट्याने घेतलेला नसून कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पावले उचलली आहेत. जनतेची सेवा आणि विकासकामे करायची असतील, तर सत्तेत असणे गरजेचे आहे; विरोधी पक्षात राहून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता येत नाहीत, स्पष्टीकरण त्यांनी दिले. संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना ते म्हणाले, “राऊत माझ्यासाठी वडिलांप्रमाणे आहेत, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. मात्र, ‘तुडवा-तुडवा’ ही भाषा आमच्या खेड्यातील लोकांची नाही.”
संघर्ष आमच्या रक्तातच!
“मी संघर्षातूनच वर आलो आहे, माझे वडीलही संघर्षातून पुढे आले आणि आता माझ्या तिसर्या पिढीला देखील संघर्ष करावा लागत आहे. संघर्ष आमच्या नाळेत बांधलेला असल्याने मी कोणालाही घाबरत नाही,” असे ठाम प्रतिपादन आष्टीकर यांनी केले. काही नेत्यांकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेला टोला लगावताना ते म्हणाले की, पालणाघर आणि इतर विषयांचा काय संबंध आहे, हेच मला समजले नाही. आम्ही खेड्यातील साधी माणसे आहोत, आम्हाला अशा मोठ्या गोष्टी समजत नाहीत. दरम्यान, या जाहीर आव्हानानंतर ठाकरे गट आणि आष्टीकर समर्थकांमध्ये संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

COMMENTS