नांदेड: विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडणार्या स्कूलबस आणि स्कूल व्हॅनच्या सुरक्षिततेबाबत नांदेडमध्ये मोठे प्रश्

नांदेड: विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडणार्या स्कूलबस आणि स्कूल व्हॅनच्या सुरक्षिततेबाबत नांदेडमध्ये मोठे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. राज्यातील काही गंभीर घटनांनंतर पालकांमध्ये कमालीची चिंता वाढली असून, शालेय वाहतूक व्यवस्थेची सर्वंकष तपासणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
पुणे-सासवड मार्गावरील एका शालेय बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. बसमध्ये सुमारे ५० विद्यार्थी असताना सुदैवाने मोठा अनर्थ टळला. त्यापूर्वी पंढरपूर परिसरात झालेल्या अपघातानेही पालकांना हादरवून सोडले होते. या घटनांमुळे नांदेड शहरातील शालेय वाहनांच्या सुरक्षिततेकडे पुन्हा एकदा गंभीरतेने लक्ष वेधले जात आहे. शहरातील अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी खासगी बस आणि व्हॅनचा वापर करतात. मात्र, काही ठिकाणी जुनी आणि कालबाह्य वाहने वापरली जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. प्रवासादरम्यान वाहने अचानक बंद पडणे, नियमित देखभालीचा अभाव आणि सुरक्षेच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
शालेय वाहनांसाठी सर्वोच्च न्यायालय आणि परिवहन विभागाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन होत आहे का, याविषयीही प्रश्न उपस्थित होत आहेत. वाहनमालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यातील करार, वाहनांची तांत्रिक तपासणी, चालक व वाहकांची पोलीस पडताळणी, आरोग्य तपासणी आणि प्रशिक्षण प्रक्रिया नियमितपणे पार पाडली जाते का, याची सखोल तपासणी होण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. तसेच, बसमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र, आपत्कालीन दरवाजा, जीपीएस आणि सीसीटीव्ही यंत्रणा प्रत्यक्ष कार्यरत आहेत का, याचीही खातरजमा होणे गरजेचे आहे.
विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना, महिला कर्मचार्यांची उपलब्धता आणि तक्रार निवारण व्यवस्था प्रभावी आहे का, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील अनेक शाळा वर्दळीच्या रस्त्यांलगत असल्याने विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना मदत करण्यासाठी सुरक्षा रक्षक नियुक्त केले जातात का, शालेय वाहनांचा वेग मर्यादेत राहतो का, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, परिवहन विभाग, वाहतूक शाखा आणि शिक्षण विभागाने संयुक्तपणे शालेय वाहनांची विशेष तपासणी मोहीम हाती घ्यावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक आणि नागरिकांमधून होत आहे.

COMMENTS