लोकसभेतील प्रलंबित कामे, पाणीटंचाई, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदा

लोकसभेतील प्रलंबित कामे, पाणीटंचाई, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदारांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आठ खासदारांनी पंतप्रधान कार्यालयात सकाळी साडेअकराच्या सुमारास मोदी यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्रातील पाणीटंचाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या अडचणी तसेच विविध मतदारसंघांतील रखडलेल्या विकासकामांबाबत यावेळी निवेदन देण्यात आल्याची माहिती आहे.
ही भेट प्रामुख्याने जनतेच्या प्रश्नांसाठी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सांगण्यात आले असले, तरी या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या २५ दिवसांत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत केलेल्या भेटींची संख्या पाहता, राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर खासदारांनी स्वतंत्रपणे भूमिका मांडली. बीड जिल्ह्यातील पाणीप्रश्नासह केंद्राकडून मिळणाऱ्या निधीचा मुद्दा खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला. उजनी धरणातून बीड जिल्ह्यासाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी त्यांनी केली. तसेच पंतप्रधान सहाय्यता निधीतून खासदारांना मिळणाऱ्या मदतीच्या मर्यादेत वाढ करण्याची मागणीही त्यांनी केली.
नवी मुंबईतील विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रश्न खासदार सुरेश म्हात्रे यांनी मांडला. राज्य सरकारने याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला असल्याने केंद्राने यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
खासदार निलेश लंक यांनी आपल्या मतदारसंघातील आरोग्यविषयक प्रश्नांसह गंभीर आजारांवरील उपचारांच्या सुविधांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले. खासदार अमोल कोल्हे यांनी नाशिक-पुणे जलद रेल्वे प्रकल्पाचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला. तर खासदार अमर काळे यांनी त्यांच्या मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांचा आढावा पंतप्रधानांसमोर मांडला.
‘भेट लपूनछपून नाही, जनतेच्या प्रश्नांसाठी’
पंतप्रधान मोदी यांच्या भेटीपूर्वीच सुप्रिया सुळे यांनी या भेटीमागील भूमिका स्पष्ट केली होती. महाराष्ट्रातील पाणीटंचाई, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न या विषयांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेत असल्याचे त्यांनी सांगितले होते. पंतप्रधानांची भेट घेण्यात कोणतीही गुप्तता नसून, महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी ही चर्चा उघडपणे केली जात असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या भेटीला केवळ राजकीय भेट म्हणून पाहू नये, असेही त्यांनी सुचवले.
मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुळे यांच्या स्पष्टीकरणानंतरही या भेटीभोवतीचे राजकीय कुतूहल कमी झालेले नाही. मतदारसंघांची पुनर्रचना प्रस्ताव, महिला आरक्षण आणि आगामी राजकीय समीकरणे या पार्श्वभूमीवर सुळे यांच्या दिल्लीतील भेटींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. गेल्या काही दिवसांतील भेटींची मालिका पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची सत्ताधाऱ्यांशी जवळीक वाढते आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. १५ जुलै रोजी सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.

COMMENTS