मुंबई : ‘‘राजकारण माझ्या मनासारखे किंवा विचारांसारखे वाटले नाही, तर समृद्धी महामार्गाला बाहेर पडण्यासाठी ‘एक्झिट’ असतो, तसा मलाही वेळोवेळी राजकार

मुंबई : ‘‘राजकारण माझ्या मनासारखे किंवा विचारांसारखे वाटले नाही, तर समृद्धी महामार्गाला बाहेर पडण्यासाठी ‘एक्झिट’ असतो, तसा मलाही वेळोवेळी राजकारणातून बाहेर पडावे किंवा निवृत्त व्हावेसे वाटते,’’ असे विधान मंत्री पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या विधानानंतर राजकरणात एकच खळबळ उडाली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याचा ऑफर दिली. वडेट्टीवार म्हणाले की, ‘तुमची (पंकजा मुंडेंनी) ओबीसींचे नेतृत्व करावे, भाजपमधून बाहेर पडावे. महाराष्ट्राच्या पहिल्या ओबीसी मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही आणि आमचा पक्ष तुम्हाला पूर्ण साथ देऊ.’ वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर पत्रकारांनी त्यांना पंकजा मुंडे यांनी खरच भाजपा सोडली तर त्यांना काँग्रेसमध्ये घेणार का? असा सवाल केला. त्यावर ते म्हणाले, ‘पंकजा मुंडे जर भाजपमधून बाहेर पडल्या तर आम्ही त्यांना १०० टक्के काँग्रेस पक्षात प्रवेश देऊ.’ वडेट्टीवार यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘त्यांना जर असे वाटत असेल की पक्षात योग्य न्याय मिळत नाही, कुटुंबाच्या त्यागाला काहीच महत्त्व दिले जात नाहीये, तर त्या नैराश्यातूनच त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचे विधान केले असावे. पण पंकजाताईंना विनंती राहील की, त्या सक्षम आणि मोठ्या ओबीसी नेत्या आहात. त्यामुळे राजकारणातून निवृत्त होण्यासारखे टोकाचे पाऊल न उचलता, बिंधास्तपणे भाजपमधून बाहेर पडा आणि राज्याच्या ओबीसी समाजाचे नेतृत्व करा.’

COMMENTS