पुणे : 'हर घर तिरंगा' अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आज मंगळवारी (११ ऑगस्ट) तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तिरंगा गौरव समितीच्या वतीन
पुणे : ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आज मंगळवारी (११ ऑगस्ट) तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तिरंगा गौरव समितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सहभागी होणार आहेत. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.
रॅलीला दुपारी दोन वाजता ललित महल चौकातून सुरुवात होणार असून गरवारे चौक येथे तिचा समारोप होईल. ललित महल चौक, ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, गुडलक चौक आणि त्यानंतर गरवारे चौक असा रॅलीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. रॅलीच्या कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांकडून काही मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक या मार्गावरील वाहतूक रॅली पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. स्वारगेटकडून पुणे विद्यापीठाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांनी अलका चौक, खंडोजी बाबा चौक, वीर सावरकर चौक, ना. सी. फडके चौक, मांगिरबाबा चौक, सेनादत्त चौक, बालशिवाजी-म्हात्रे पुला, नळस्टॉप आणि विधि महाविद्यालय रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा, असे वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.
स्वारगेटकडून खडकी तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठीही आवश्यकतेनुसार पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रॅलीच्या वेळेत संबंधित मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता असल्याने वाहनधारकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रॅलीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रमुख चौक आणि मार्गांवर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाहतूक सुरळीत राहावी तसेच नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी परिस्थितीनुसार वाहतूक वळवण्याचे निर्णय घेण्यात येणार आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS