बीड: अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी जमिनी दिलेल्या बीड तालुक्यातील शेतकर्यांना भूसंपादनाचा परिपूर्ण मोबदला मिळावा आणि त्यांच्या प्रलंबित

बीड: अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी जमिनी दिलेल्या बीड तालुक्यातील शेतकर्यांना भूसंपादनाचा परिपूर्ण मोबदला मिळावा आणि त्यांच्या प्रलंबित समस्या तातडीने सुटाव्यात, यासाठी खा. बजरंग सोनवणे यांनी शनिवारी केज येथून भल्या पहाटेच निवासस्थान सोडत अहिल्यानगर गाठले आणि सकाळीच रेल्वे अधिकार्यांची भेट घेत चर्चा केली.
शुक्रवारी बीड येथे आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या (डीपीडीसी) बैठकीनंतर घाटसावळी (ता. बीड) आणि परिसरातील इतर गावांतील शेतकरी बांधवांनी खा. बजरंग सोनवणे यांची भेट घेतली होती. रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य व परिपूर्ण मोबदला अद्याप मिळालेला नाही, तसेच भूसंपादनाशी संबंधित अनेक प्रकरणे दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याचे शेतकर्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतकर्यांची व्यथा ऐकून घेतल्यानंतर खा. सोनवणे यांनी या विषयावर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
दिलेल्या शब्दाला जागून, शनिवारी पहाटे ५ वाजता खा. सोनवणे आपल्या ’पवनसूत’ या निवास्थानावरून थेट अहिल्यानगर येथील मध्य रेल्वेच्या कार्यालयात धडकले. शासकीय कार्यालय सुरू होण्याची वेळ झालेली नसतानाही, त्यांनी मध्य रेल्वेचे उपअभियंता लोळगे यांना लवकर कार्यालयात बोलावून प्रत्यक्ष चर्चा केली.
या बैठकीदरम्यान खा. सोनवणे यांनी रेल्वे भूसंपादनाचा प्रलंबित मोबदला शेतकर्यांना तात्काळ हस्तांतरित करावा, मोबदल्यातील तफावत दूर करावी आणि भूसंपादनाशी संबंधित इतर कागदपत्रांचा निपटारा गतीने करावा, अशा स्पष्ट सूचना अधिकार्यांना दिल्या. रेल्वे प्रकल्पाचे काम करत असताना भूमीपुत्रांवर कोणताही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यास त्यांनी बजावले.
“शेतकरी बांधवांनी आपल्या हक्काच्या जमिनी रेल्वे प्रकल्पासाठी दिल्या आहेत. त्यांना वेळेत आणि योग्य मोबदला मिळणे हा त्यांचा न्याय्य हक्क आहे. शेतकर्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असून, त्यांच्या प्रत्येक प्रलंबित प्रश्नाची तडी लागेपर्यंत माझा हा पाठपुरावा असाच कायम राहील.”
— खा. बजरंग सोनवणे, बीड

COMMENTS