मुंबई : महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या घरगुती अर्थसंकल्पावर आणखी एक भार पडला आहे. महाराष्ट्रात मंगळवार ११ ऑगस्टपासून गाईच्या आणि म्हशीच्

मुंबई : महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या घरगुती अर्थसंकल्पावर आणखी एक भार पडला आहे. महाराष्ट्रात मंगळवार ११ ऑगस्टपासून गाईच्या आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गाईचे दूध आता ६२ रुपये, तर म्हशीचे दूध ७८ रुपये प्रतिलिटर दराने विकले जाणार आहे. दूध उत्पादक आणि दूध प्रक्रिया उद्योगाशी संबंधित संघटनेच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. वाढत्या उत्पादन खर्चामुळे दूध उत्पादक तसेच दूध प्रक्रिया उद्योगावर आर्थिक ताण निर्माण होत असल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी गाईच्या दुधाचा प्रतिलिटर दर ६० रुपये होता. त्यात दोन रुपयांची वाढ झाल्याने आता ग्राहकांना त्यासाठी ६२ रुपये मोजावे लागतील. म्हशीच्या दुधाचा दरही ७६ रुपयांवरून ७८ रुपये प्रतिलिटर करण्यात आला आहे. नवे दर ११ ऑगस्टपासून राज्यभर लागू झाले आहेत. दररोज दूध खरेदी करणाऱ्या कुटुंबांना या वाढीचा थेट परिणाम जाणवणार आहे. एखाद्या कुटुंबात दररोज दोन ते तीन लिटर दूध वापरले जात असल्यास महिन्याच्या खर्चातही त्यानुसार वाढ होणार आहे. मोठ्या कुटुंबांमध्ये हा अतिरिक्त खर्च आणखी वाढू शकतो. दूध दरवाढीमागे अनेक कारणे असल्याचे दुग्ध उद्योगाशी संबंधित संघटनेकडून सांगण्यात आले आहे. जनावरांसाठी लागणारे पशुखाद्य, त्यांची देखभाल, दूध संकलन, प्रक्रिया, पॅकिंग आणि वाहतूक या सर्व बाबींच्या खर्चात वाढ झाली आहे. दूध उत्पादकांकडून संकलित केलेले दूध प्रक्रिया केंद्रांपर्यंत नेणे आणि तिथून विविध भागांमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवणे यासाठी मोठा खर्च होतो. इंधनाच्या वाढलेल्या किमतींमुळे वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. याशिवाय दूध साठवणूक आणि पॅकिंगसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्याने प्रक्रिया उद्योगाच्या खर्चात भर पडली आहे. दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा आणि प्रक्रिया उद्योगाचा वाढता खर्च भरून निघावा, यासाठी दरवाढ आवश्यक असल्याची भूमिका संबंधित संघटनेने घेतली आहे. दुधाच्या दरवाढीचा परिणाम केवळ घरगुती वापराच्या दुधापुरता मर्यादित राहण्याची शक्यता नाही. दूध हा अनेक दुग्धजन्य पदार्थांचा प्रमुख कच्चा माल असल्याने दही, ताक, लोणी, पनीर, चीज, तूप तसेच दुधापासून तयार होणाऱ्या विविध मिठाईच्या किमतींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत सुमारे दहा टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांचे घरगुती बजेट कोलमडले : दूध आणि त्यापासून तयार होणारे पदार्थ हे बहुतांश कुटुंबांच्या रोजच्या आहाराचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे या वस्तूंच्या किमती वाढल्याचा परिणाम थेट घरगुती खर्चावर होतो. आधीच अन्नधान्य, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना दूध दरवाढीमुळे आणखी खर्चाचे नियोजन करावे लागणार आहे. दुसरीकडे, वाढत्या उत्पादन खर्चामुळे दूध उत्पादकांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ग्राहंवरील अतिरिक्त आर्थिक भार आणि दूध उत्पादकांना मिळणारा योग्य मोबदला यांच्यात समतोल साधण्याचे आव्हान दुग्ध क्षेत्रासमोर कायम आहे.

COMMENTS