मुंबई : राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या मनमानी कारभारावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठा हातोडा चालवला आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने

मुंबई : राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या मनमानी कारभारावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठा हातोडा चालवला आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 आणि त्याअंतर्गत ‘शेड्युल टी’ (Schedule T) मधील ‘गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस’ (GMP) नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या 10 आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांचे परवाने एफडीएने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. राज्यभरातील 434 परवानाधारक संस्थांची अचानक तपासणी मोहीम राबवून ही धडक कारवाई करण्यात आली. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली. एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील कारखाना परिसराची स्वच्छता, तांत्रिक मनुष्यबळ, गुणवत्ता नियंत्रण (Quality Control), चाचणी नोंदी (Testing Records), एसओपी (SOPs) आणि उत्पादनांचे लेबल्स यांसारख्या विविध निकषांची कसून छाननी करण्यात आली. या तपासणीदरम्यान नियम धाब्यावर बसवणाऱ्या 135 आयुर्वेदिक उत्पादक संस्थांना ‘कारणे दाखवा’ नोटीसा बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. परवाने कायमस्वरूपी रद्द झालेल्या 10 संस्था :
- मे. कृष्णा हर्बल – बारामती, पुणे
- मे. लालशाह ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स – करंजा, गोंदिया
- मे. आदित्य फार्मा – वडेगाव, तिरोडा, गोंदिया
- मे. अंगरस आयुर्वेद – वडेगाव, तिरोडा, गोंदिया
- मे. कालिदास गांधी – पुणे
- मे. शिवनाथ आयुर्वेदिक प्रोडक्ट्स कंपनी – सिन्नर, नाशिक
- मे. इंडुकेअर फार्मा प्रा. लि. – जेजुरी एमआयडीसी, पुरंदर, पुणे
- मे. हकीम आयुर्वेदिक ब्युटी केअर – अमरावती
- मे. हिलॅरियस आयुर्वेद – एमआयडीसी मुंडीपार, गोंदिया
- मे. यशोदा लॅब प्रा. लि. – नाशिक रोड, नाशिक तपासणीदरम्यान आढळलेल्या गंभीर त्रुटी : गैरहजेरी : मान्यताप्राप्त तांत्रिक व्यक्ती गैरहजर असतानाही औषधांचे उत्पादन सुरू असणे. यंत्रसामग्रीचा अभाव : काही कंपन्यांमध्ये गुणवत्ता नियंत्रण विभागच नव्हता, तर औषध चाचणीसाठी आवश्यक यंत्रे उपलब्ध नव्हती. अस्वच्छता व बोगस लेबल्स : उत्पादन परिसर अत्यंत अस्वच्छ असणे आणि औषधांच्या लेबलवर चुकीच्या उत्पादनाच्या तारखा (Manufacturing Dates) छापणे. नोंदीचा अभाव : कच्च्या व तयार मालाच्या चाचणीचे अभिलेख, मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी नसणे. भेसळ धोका : विविध औषधांचे घटक एकमेकांत मिसळू नयेत यासाठी आवश्यक कार्यपद्धतीचा (Cross-Contamination SOPs) अभाव असणे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि मानकांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही औषध उत्पादकाची गय केली जाणार नाही, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

COMMENTS