श्रीगोंदा : श्रीगोंदा शहर व परिसरात अवैधरित्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी क

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहर व परिसरात अवैधरित्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एकूण १ लाख १० हजार ९७६ रुपयांचा पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन आरोपी फरार आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष पथक तयार करून कारवाईचे नियोजन केले. पोलीस अंमलदार गणेश लोंढे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रताप देवकाते, सुनील मालणकर आणि बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने १० ऑगस्ट रोजी ही धडक कारवाई केली. पहिल्या कारवाईत स्वप्नील भीमराव कवडे (वय ३२, रा. होले मळा, श्रीगोंदा) आणि अमोल रामदास जाधव (रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी ६३ हजार १६ रुपयांचा पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. अमोल जाधव हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. दुसऱ्या कारवाईत बन्सी गंगाधर काळे (वय ६२, रा. अवधूतनगर, श्रीगोंदा) आणि अमोल रामदास जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या छाप्यात ३५ हजार ८६० रुपयांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. या प्रकरणातही अमोल जाधव फरार आहे. तिसऱ्या कारवाईत अल्ताफ गुलाब मुजावर (वय ५४, रा. तान्हाई अपार्टमेंट, श्रीगोंदा) आणि सलीम दिलावर पिरजादे (रा. अजनूज, ता. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या ठिकाणाहून १२ हजार १०० रुपयांचा पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सलीम पिरजादे हा फरार आहे. या तिन्ही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

COMMENTS