नायगाव तालुक्यातील मांजरम गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सर्वत्र खड्डे, साचलेले सांडपाणी आणि कचर्याचे ढीग यामुळे ग्रामस

नायगाव तालुक्यातील मांजरम गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सर्वत्र खड्डे, साचलेले सांडपाणी आणि कचर्याचे ढीग यामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यात नाली की नालीत रस्ता? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
गावातील अनेक रस्त्यांवर पावसाचे व सांडपाण्याचे पाणी साचत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दररोज शाळेत जाणारे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना या रस्त्यांवरून मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ते पूर्णपणे उखडल्याने पायी चालणेही धोकादायक बनले असून अपघाताची भीती कायम आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामीण रस्ते आणि स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असतानाही मांजरममध्ये विकासकामांचा मागमूस दिसत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीला मिळालेला स्वच्छता व विकास निधी नेमका कुठे खर्च झाला, याची चौकशी करून निधीच्या वापराबाबत पारदर्शकता ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, पंचायत समिती व जिल्हा प्रशासनाने तातडीने पाहणी करून रस्त्यांची दुरुस्ती, नाल्यांची साफसफाई आणि स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर हाती घ्यावीत, तसेच संबंधित जबाबदारांवर आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांचा इशारा
ग्रामपंचायत नावाची व्यवस्था गावात प्रत्यक्ष काम करते का, हा प्रश्न आज प्रत्येक नागरिकाला पडला आहे. रस्ते, नाल्या आणि स्वच्छतेची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल.
– पांडुरंग शिंदे, मांजरमकर

COMMENTS