नांदेड : नांदेड परिक्षेत्रात सध्या अवैध व्यवसायांविरोधात १ ते ३१ मे २०२६ दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या २५ व्या दिवशी पोली
नांदेड : नांदेड परिक्षेत्रात सध्या अवैध व्यवसायांविरोधात १ ते ३१ मे २०२६ दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या २५ व्या दिवशी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने परिक्षेत्रात धडक कारवाया केल्या. काल दिवसभरात अवैध व्यवसाय करणाऱ्या ५९ इसमांवर एकूण ३८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल ५० लाख ९७ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेत सर्वात मोठी कारवाई लातूर शहरात करण्यात आली. पोलीस उप महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी महाराज चौक ते दयानंद कॉलेज रोडवर चालणाऱ्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत मटका खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या ११ जणांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून रोख रक्कमेसह २ लाख ५७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याशिवाय परिक्षेत्रात इतर ठिकाणीही पोलिसांनी बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्या ३ इसमांकडून २७ लाख १ हजार २५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच मटका-जुगाराच्या ६ केसेसमध्ये ५५ हजार ६२० रुपये, अवैध दारू विक्रीच्या १६ प्रकरणांत २७ हजार ६२० रुपये, बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर २ गुन्हे नोंदवून १५ लाख ८ हजार रुपये, आणि अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या ३ जणांवर कारवाई करत ५ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच शस्त्र अधिनियमान्वये ३ आणि कोटपा कायद्यांतर्गत ६ कारवाया करण्यात आल्या.
नागरिकांसाठी ‘खबर’ हेल्पलाईन सुरू नागरिकांना आपल्या भागातील अशा अवैध धंद्यांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ९१५०१००१०० ही ’खबर’ हेल्पलाईन सुरू केली आहे. या क्रमांकावर फोन करून किंवा व्हॉट्सॲपवर माहिती देण्याचे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले असून, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS