Homeताज्या बातम्या

निष्ठावंतांची अवहेलना: नांदेड भाजपमध्ये अंतर्गत वादाचा भडका; ८३ वर्षीय प्रा. गणपत राऊत यांचा महाप्रशिक्षण शिबिरात अवमान

नांदेड : शहराच्या भाजपमध्ये काँग्रेस पार्श्वभूमीचे नेते आणि पंचतारांकित संस्कृती रुजल्यामुळे पक्षातील जुन्या निष्ठावंत नेत्यांची अवहेलना होत असल्

अशोकरावांविरुद्ध सर्वपक्षीय मोर्चेबांधणी? नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपला रोखण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली
नांदेड विधान परिषद रणधुमाळी : नाराजांची कुजबुज की पक्षशिस्तीचा बुलडोझर?
नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत राजूरकरांची ’चाणक्यनीती’ ठरली निर्णायक? संगीता डक पाटील यांच्या विजयाची शहरात राजकीय चर्चा

नांदेड : शहराच्या भाजपमध्ये काँग्रेस पार्श्वभूमीचे नेते आणि पंचतारांकित संस्कृती रुजल्यामुळे पक्षातील जुन्या निष्ठावंत नेत्यांची अवहेलना होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. जनसंघाच्या काळापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले ८३ वर्षीय ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष प्रा. गणपतराव राऊत यांनी भाजप महानगराध्यक्षांना खडे बोल सुनावणारे पत्र पाठवून याबद्दल आपला तीव्र राग व्यक्त केला आहे.

सत्ता येते आणि जाते, पण पक्षाचा पाया रचणारे ज्येष्ठ कार्यकर्ते जेव्हा उपेक्षित होतात, तेव्हा संघटनेच्या कार्यसंस्कृतीवर प्रश्नचिन्ह उभे राहते. नांदेड महानगर भाजप तर्फे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण अभियान’ एका रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आले होते. या अभियानातील १७ मे रोजीच्या एका सत्राचे अध्यक्षस्थान प्रा. राऊत यांना देण्यात आले होते आणि पत्रिकेतही त्यांच्या नावाचा उल्लेख होता.

पक्षाचे संघटन सरचिटणीस विजय गंभीरे यांनी फोन केल्यानंतर, सुरुवातीला वयाचे कारण देत असमर्थता दर्शवूनही पक्षावरील निष्ठेपोटी प्रा. राऊत यांनी येण्यास होकार दिला. नियोजनाप्रमाणे शितल खांडील हे त्यांना आणण्यासाठी गाडी घेऊन गेले. मात्र, प्रवास सुरू असतानाच खांडील यांना एका वरिष्ठ नेत्याचा फोन आला आणि त्यांनी प्रा. राऊत यांना तुमचे सत्र रद्द झाल्याचे सांगत रस्त्यातच गाडीतून उतरवून दिले. यानंतर पक्षाच्या कोणत्याही जबाबदार पदाधिकाऱ्याने त्यांची साधी विचारपूस करण्याची किंवा दिलगिरी व्यक्त करण्याची तसदी घेतली नाही.

नाराजीचे जाहीर पत्र आणि राजकीय पडसाद: हा अपमान प्रा. राऊत यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी थेट भाजप महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांना दीर्घ पत्र पाठवून आपला संताप व्यक्त केला आहे. “मी सध्या कार्यरत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये सर्वात ज्येष्ठ आहे. मी स्वतःहून कधीही अध्यक्षपदाची मागणी केली नव्हती. जर तुम्ही मला मानसन्मान देऊ शकत नसाल, तर असा जाहीर अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असा रोकडा सवाल त्यांनी पत्रातून केला आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रा. राऊत यांचे हे पत्र बाहेर आल्याने नांदेड भाजपमधील जुने विरुद्ध नवे असा अंतर्गत वाद आता पूर्णपणे चव्हाट्यावर आला आहे.

COMMENTS