मुंबई : मराठी लिहिता वाचता येत नसेल त्या रिक्षा टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरना

मुंबई : मराठी लिहिता वाचता येत नसेल त्या रिक्षा टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी घेतला आहे. येत्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवसापासून ही कारवाई केली जाणार आहे, असे आदेश देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. दरम्यान, या निर्णयाला रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना आणि संयुक्त कृती समिती अध्यक्षांनी तीव्र विरोध केला आहे. अशा प्रकारे कायदा आणणे म्हणजे आमच्यावर अन्याय आहे, हा निर्णय चुकीचा आहे. या निर्णयाचा विरोधात आम्ही आवाज उठवणार, असे रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनांनी म्हंटले आहे. दरम्यान मुंबई आणि इतर शहरातील अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालक यांची युनियन आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या विषयी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, मोटार परिवहन विभागामार्फत रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचे, म्हणजेच मराठी भाषेचे ज्ञान असणे हा नियम आधीपासूनच लागू आहे. मात्र, मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे यांसारख्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही, तसेच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत.
येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येत आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
आपल्या मातृभाषेचा अभिमान असणे जितके आवश्यक आहे, तितकेच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणेही महत्त्वाचे आहे.
म्हणूनच 1 मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता व वाचता येणे बंधनकारक राहील. नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील. तसेच नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

COMMENTS