बेलापूर : बेलापूर बु. ते वळदगाव या मार्गाची अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून संपूर्ण रस्ता खड्डेमय बनला आहे. यामुळ

बेलापूर : बेलापूर बु. ते वळदगाव या मार्गाची अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून संपूर्ण रस्ता खड्डेमय बनला आहे. यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून संतप्त नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या मार्गावर खाणीतील २० ते ४० टन वजनाची मुरूम, खडी व दगड वाहून नेणारी अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर धावत असल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यातच अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्ता पूर्णपणे उखडून खड्डेमय झाला आहे.
या रस्त्यावरून परिसरातील शेतकरी, विद्यार्थी तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. खराब रस्त्यामुळे अनेक किरकोळ अपघात घडले असून काही दिवसांपूर्वी वळदगाव खाण परिसरात दुचाकी घसरून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“खाणीमधून अवजड वाहने चालवून पैसे कमवायचे आणि सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळायचे का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. या मार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
आरटीओ, पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करून अवजड वाहनांवर निर्बंध घालावेत तसेच रस्त्याच्या नुकसानीची भरपाई संबंधितांकडून वसूल करावी, अशी मागणी होत आहे. वळदगाव ग्रामपंचायतीकडेही नागरिकांनी तक्रारी केल्या असून शाळकरी मुला-मुलींना या रस्त्यामुळे मोठा त्रास होत आहे. त्यामुळे या अरुंद मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीस तातडीने बंदी घालून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

COMMENTS