काठमांडू : भारत आणि नेपाळ दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सीमावादावर नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह ऊर्फ 'बालेन शाह' यांनी संसदेत ए

काठमांडू : भारत आणि नेपाळ दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सीमावादावर नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह ऊर्फ ‘बालेन शाह’ यांनी संसदेत एक खळबळजनक विधान केले आहे. केवळ भारतानेच नाही, तर नेपाळनेही अनेक ठिकाणी भारतीय भूभागावर अतिक्रमण केले आहे, असे वक्तव्य पंतप्रधान शाह यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे नेपाळच्या संसदेत विरोधकांनी जोरदार गदारोळ केला आहे. देशांतर्गत राजकारणात बालेन शाह यांच्यावर प्रचंड टीका होत असून, या विधानामुळे लिपुलेख आणि कालापानी सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.
चालू वर्षाच्या सुरुवातीला नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर बालेन शाह हे पहिल्यांदाच संसदेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी दोन्ही देशांमधील संबंधांमधील कटुता मान्य करत, हा वाद इतिहासकार, भूमापक आणि तज्ज्ञांच्या मदतीने सामोपचाराने सोडवला पाहिजे, अशी भूमिका मांडली.
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी खासदारांना संबोधित करताना सांगितले की, “मी पंतप्रधान झाल्यानंतर मला नुकतीच एक अशी माहिती मिळाली, जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. भारताने केवळ नेपाळच्या जमिनीवर अतिक्रमण केले नाही, तर नेपाळनेही अनेक ठिकाणी भारताची जमीन बळकावली आहे. आता दोन्ही देशांनी वस्तुस्थितीचा अभ्यास करून मित्राप्रमाणे एकत्र बसून हा वाद कायमचा मिटवावा.” इतकेच नव्हे तर, काठमांडूने या संदर्भात केवळ भारतच नव्हे, तर चीन आणि थेट ब्रिटन सरकारशीही संपर्क साधल्याचे शाह यांनी सांगितले. ब्रिटिशांच्या काळातील करारांमुळे हा वाद निर्माण झाल्याने त्यांनी ब्रिटनचा उल्लेख केला. बालेन शाह यांच्या या विधानानंतर नेपाळच्या संसदेत एकच गदारोळ उडाला. विरोधी पक्षांनी या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला असून हे विधान संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.

COMMENTS