नांदेड : जिल्ह्यात अवैध रेती उपसा आणि वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात धडक क

नांदेड : जिल्ह्यात अवैध रेती उपसा आणि वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात धडक कारवाई करत तब्बल २ कोटी १५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ४ नामजद आणि ६ अनोळखी अशा एकूण १० आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. गंगाबेट शिवारातील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलिसांनी ३१ मे २०२६ रोजी रात्री विशेष पथकासह नदीपात्रात छापा टाकला.
बोटी, हायवा गाड्या आणि इंजिने जप्त: या कारवाईदरम्यान पोलिसांनी २ हायवा गाड्या, १ ट्रॅक्टर-ट्रॉली, २ मोठ्या लोखंडी बोटी, २ फायबर बोटी, ५२ तराफे आणि रेती उपसा करण्यासाठी वापरली जाणारी ११ इंजिने जप्त केली. बेकायदेशीर कामासाठी वापरण्यात येणारे काही बोटी व तराफे पोलिसांनी जागीच नष्ट केले. तसेच नदीपात्रातून एकूण १०८ ब्रास रेती हस्तगत करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हनमंत उत्तमराव तेलंग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये बालाजी अशोक सांगळे (रा. बामणी), बळीराम गोवर्धन चव्हाण (रा. लिंबोटी तांडा), अशोक मोरे (रा. सोनखेड), अतुल प्रभाकर गच्चे (रा. जवळा) यांच्यासह इतर सहा अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडाकेबाज कारवाई पूर्ण केली.

COMMENTS