नांदेड : मुंबईतील निर्मलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या नराधम आरोपीला नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठ्या

नांदेड : मुंबईतील निर्मलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या नराधम आरोपीला नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली असून, आरोपीला पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी व तपशील: मुंबईतील खार पूर्व भागात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. याप्रकरणी मुंबईच्या निर्मलनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६५(१), ७४, ७७, ३५१(१) सह पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून अटक टाळण्यासाठी आरोपी फरार झाला होता.
- अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव: मोहम्मद आवेश मोहम्मद गौस मनियार (वय २६ वर्षे, रा. खुदबेनगर, नांदेड).
अशी झाली अटक: नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ मोहीम राबवून सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले होते. याच दरम्यान, मुंबई पोलीस दल आरोपीचा शोध घेत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोहोचले. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, आरोपी मोहम्मद आवेश हा नांदेड येथील मलंगबाबा बिल्डिंगजवळ, ईदगाह परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस आणि मुंबई निर्मलनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने परिसरात सापळा रचून अत्यंत शिताफीने या नराधम आरोपीला ताब्यात घेतले.
कारवाई करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार: ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव (नांदेड) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे (इतवारा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, विजय धस आणि अंमलदार वसंत केंद्रे, समीर अहमद, शंकर माळगे, धम्मपाल कांबळे यांच्यासह मुंबई पोलीस पथकातील मयूर भोईर आणि सागर राठोड यांनी या कारवाईत सहभाग घेतला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून फरार आरोपीला बेड्या ठोकणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षकांनी जाहीर कौतुक केले आहे.

COMMENTS